जळगाव – ना नियोजन, ना भीती. एकदम बिनधास्त कारभार. कोरोनाचा एक जरी रुग्ण आला तर एका सेकंदात शेकडो बाधित होतील. हा इशारा दुसरे, तिसरे कोणीही नसून जळगावची बाजार समिती आपल्याला देत आहे पण त्याकडे कोणाचेही लक्ष नाही.
शहरातील रहिवासी बाळकृष्ण देवरे यांनी आज ‘जनशक्ती’ला या बाजार समितीमधील गर्दीचे, तेथील निष्काळजीपणाचे काही फोटो पाठवले. ते पाहून कोणाच्याही अंगावर सरसरून काटा येईल. सकाळी 6 वाजेपासून एमआयडीसीमधील बाजार समितीत मोठ्या प्रमाणात नागरिकांची, लहान-मोठ्या विक्रेत्यांची गर्दी होते. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सुरक्षात्मक यंत्रणा नसल्याने तेथे येणारे शेतकरी, व्यापारी , वाहनचालक आणि सर्वसामान्य जनतेला कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. त्यासाठी केवळ एक कोरोना रुग्ण पुरेसा ठरू शकतो.
याशिवाय वाहनचालकांना शिस्त नसल्याने रस्त्यात वाहने लावली जातात. परिणामी ट्रॅफिक जाम होते आणि गर्दी वाढते. मास्कचा वापर फार कमी जण करताना दिसतात. सॅनिटायजर नाही, स्वछता नाही. गर्दीमुळे एकमेकांना लोटतच नागरिक पुढे सरकत असतात. बाहेरगावहून वाहने माल घेऊन येत असतात. जर त्यात एखादा कोरोना बाधित व्यक्ती असला तर खूप मोठा धोका निर्माण होणार आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच उपाययोजना करायला हव्यात, अशी मागणीही बाळकृष्ण देवरे यांनी केली आहे.