कोरोना : गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रम रद्द

0

रावेर : रविवार, 5 जुलै रोजी गुरुपौर्णिमा असलीतरी कोरोनाच्या पार्श्‍वभूमी वर कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सर्वच ठिकाणी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात वसलेल्या पाल येथे परम पूज्य सदगुरु संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी स्थापित श्री वृंदावन धाम आश्रमात गुरुदर्शनासाठी देशभरातून हजारो चैतन्य साधक परीवार तसेच भाविकांची येत असलेतरी यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गुरुपौर्णिमा महोत्सव स्थगित करण्यात आला असून भाविकांना घरी राहून गुरुपौर्णिमा साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, चुंचाळे, ता.यावल येथेदेखील कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

ऑनलाईन घडणार पादुकांचे दर्शन
रावेर : सदगुरु संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजींचे समाधी दर्शन तसेच पादुका पूजनाचे दर्शन सत्संग ‘चैतन्य चैनल’ च्या माध्यमातून ऑनलाईन भाविकांना घडणार आहे. प.पू.संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी स्थापित श्री वृंदावन धाम आश्रमात गुरुदर्शनाकरीता व गुरुपौर्णिमेनिमित्त देशभरातून हजारो चैतन्य साधक परीवार येथे दरवर्षी हजेरी लावतो मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर
गुरुपौर्णिमा महोत्सव स्थगीत करण्यात आला आहे. यंदा गुरुपौर्णिमा आपापल्या घरीच साजरी करण्याचे आवाहन आश्रमाचे विद्यमान गादीपती श्रद्धेय संत श्री गोपाल चैतन्यजी महाराज यांनी सोशल मिडियातून केले आहे.

पायी प्रवास दिंडींनाही मनाई
दरवर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त महाराष्ट्रासह मध्यप्रदेशातून शेकडो किलोमीटर मजल-दरमजल करीत हजारो चैतन्य साधक येतात मात्र त्यांनाही यंदा बंदी घालण्यात आली आहे. पालसह कन्नड व मध्यप्रदेशातील चारुकेश्वर, हरसूद. व शबरी धामआम्बा या आश्रमाचे मुख्यद्वार गुरुपौर्णिमेच्या दिवशी बंद करण्यात येणार आहे. केवळ आश्रमातील साधू-संताकडूंन सकाळी पादुका पूजन, त्यानंतर दहा वाजेला श्रद्धेय संत गोपाल चैतन्य जी महाराज यांचा सत्संग, आरती सोशल डिस्टिंगच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे ‘चैतन्य चॅनल’ च्या माध्यमातून ऑनलाईन लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येणार आहे. भाविकांनी घरीच राहून परीवारासह याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रद्धेय संत श्री गोपाल चैतन्यजी महाराज व समिती तर्फे आवाहन करण्यात आले आहे.

चुंचाळ्यातही सर्व कार्यक्रम रद्द
यावल : तालुक्यातील चुंचाळे येथे सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या श्री समर्थ सुकनाथ बाबा व श्री समर्थ वासुदेव बाबा यांच्या दरबारात रविवारी गुरु पौर्णिमेनिमित्त होणारे विविध धार्मिक कार्यक्रम (पालखी मिरवणूक, दही हंडी, भजन भारूड) आदी कार्यक्रम कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रद्द करण्यात आले असल्याची माहिती श्री समर्थ वासुदेव बाबा दरबारातील शिष्यगण यांनी दिली. जळगाव जिल्हाभरातील विविध गावातील बाबा भत्तगण गुरु पौर्णिमेनिमित्त चुंचाळ्यात पायी दिंडी व मिळेल त्या वाहनाने मोठ्या संख्येने येतात मात्र कोरोणाच्या पार्श्‍वभूमीवर श्री समर्थ सुकनाथ बाबा दरबारातील विविध कार्यक्रम यावर्षी रद्द करण्यात आले आहेत. गुरु पौर्णिमा भाविकांनी घरीच साजरी करावी व चुंचाळे येथे येणे टाळावे, असे आवाहन बाबाजी भक्त गणांकडून करण्यात आले आहे.