कोरोना : अर्थव्यवस्थेच्या चिंतेमुळे जर्मनीतील अर्थमंत्र्याची आत्महत्या

0

बर्लीन – जर्मनीला करोनाचा मोठा फटका आहे. कोरोनामुळे जर्मनीची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याने येथील हेस्सी प्रांताचे अर्थमंत्री थॉमस शेफर यांनी नैराश्येमुळे आत्महत्या केली आहे. करोनामुळे जर्मनीच्या आणि प्रांताच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसल्याने चिंतेत असणार्‍या शेफर यांनी नैराश्येच्या भरात हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती हेस्सीचे प्रमुख व्होकर बौफियर यांनी दिली आहे.
थॉमस हे मागील दहा वर्षांपासून हेस्सीचे अर्थमंत्री होते. जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल ज्या सीडीयू पक्षाच्या आहेत थॉमस त्याच पक्षाचे नेते होते. करोनाच्या साथीमुळे अर्थव्यवस्थेला बसलेला फटक्यातून सावरण्यासाठी कंपन्यांना आणि कामगारांना मदत करण्यासाठी थॉमस दिवस-रात्र एक करुन काम करत होते. शनिवारी थॉमस यांचा मृतदेह रेल्वे रुळांजवळ सापडला. ५४ वर्षीय थॉमस यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज तपास अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे. आम्हाला थॉमस यांच्या मृत्यूमुळे मोठा धक्का बसला आहे. त्यांनी आत्महत्या केली आहे यावर आमचा विश्वासच बसत नाहीय. आम्ही सर्वजण खूप दुखात आहोत, असं व्होकर यांनी जारी केलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे.