कोरोनाच्या पाॅझिटीव्ह रुग्णावर नाचणखेडेच्या डॉक्टरांनी केले उपचार
जामनेर – जळगाव शहरातील मेहरूण परिसरात कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. या रुग्णावर नाचणखेडा येथील डॉक्टरांनी उपचार केले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने रुग्णाच्या संपर्कातील त्याची जामनेर येथील बहीण व उपचार करणाऱ्या डॉक्टरला उपचारासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे तर प्रशासनाने खबरदारी म्हणून नाचणखेडा गाव सील केले आहे.
या रुग्णावर उपचार केल्यानंतर नाचणखेडा येथे आल्यानंतर डॉक्टरांनी गावातील रुग्णांची तपासणी केली व कुटुंबासोबत वेळ घालवण्याची माहिती समोर येत आहे. या डॉक्टरची गावात तीन घरे आहे. कुटुंबात 25 सदस्य असावेत. त्यांच्या घराच्या परिसरातील इतरांना जाण्यापासून रोखले आहे. या डॉक्टरला तातडीने तपासणीसाठी जळगाव शासकीय रुग्णालयात आला याची माहिती आहे. त्यांच्याशी संपर्क आलेल्या नागरिकांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण आहे. या डॉक्टरचे वडील, पत्नी सुद्धा डॉक्टर आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डी. एच.पातोंडे, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. समाधान वाघ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेश सोनवणे, डॉ. संदीप पाटील, डॉ. विजय जाधव, डॉ. जितेंद्र पाटील, वाय.पी. कोकाटे, आर. बी. जाधव यांनी नाचणखेडे गावात भेट दिली. डॉक्टरच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी केली.
बहीण काही दिवसापासून भावाकडे
कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णाची बहीण गेल्या काही दिवसापासून भावाकडे होती. तिचे सासरे जामनेरचे आहे. रविवारी रात्री ती मुलासह येथे आली. ही माहिती पोलिसांना कळताच पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, डॉ. हर्षल चांदा यांनी भेट दिली. महिला व तिचा पती, चार मुलांची तपासणी करून त्यांना लगेच शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.