कोरोना आटोक्यात येण्यासाठी गाव पातळीवरील समितीने लक्ष घालावे

रावेरात गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांच्या सूचना : कोरोनाबाबत व्हिडिओ कॉन्फ्रन्सद्वारे बैठक

रावेर : रावेर ग्रामीण भागात कोरोना आटोक्यात आणण्यासाठी स्थानिक गाव पातळीवरील समितीने लक्ष घालावे, आठवडे बाजार, यात्रा, लग्न समारंभ यावर पूर्णत्वः बंदी आहे. कुणीही नियम मोडण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कारवाई दंड करा, कोरोना व्हायरसबद्दल ढिलाईपणा खपवून घेतली जाणार नसल्याचे गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांनी बैठकीत दिल्या. कोरोना व्हायरस संदर्भात रावेर तालुक्यातील ग्रामीण भागाची महत्वाची बैठक व्हिडिओ कॉन्फ्रन्सद्वारे घेण्यात आली. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी कोरोना व्हायरससंदर्भात दिलेल्या आदेशाचे ग्रामीण स्तरावर अंमलबजावणी व्हावी याबद्दलच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी कोतवाल पुढे बोलतांना म्हणाल्या की, गाव पातळीवर बाहेरुन आलेल्यांची अँटीजन टेस्ट बंधनकारक असल्याचे त्यांनी बैठकीत स्पष्ट केले.

ग्रामीणला कारवाईसाठी समिती गठीत
रावेर तालुक्यात सद्यस्थितीत 46 रुग्ण कोरोनाबाधीत असून यासाठी गटविकास अधिकारी कोतवाल यांनी ग्रामस्तरावर सरपंच, पोलिस पाटील, ग्रामसेवक, आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका यांची समिती गठीत करून गावात होणारेकार्यक्रम तसेच विनामास्क फिरणार्‍यांवर ही समिती दंड करणार आहे. या समितीची आठवड्यातून एक बैठक होणार आहे.

अँटीजन टेस्टसाठी कॅम्प राबविणार
बैठकीत ग्रामीण स्तरावर वेग-वेगळ्या गावात यापुढे कोरोना बाधीत रुग्ण शोधून काढण्यासाठी अँटीजन टेस्ट कॅम्प राबविण्यात येणार आहे. यात ज्यांना कोरोनाची लक्षणे जाणवत असेल त्यांनी तत्काळ टेस्ट करून घ्यावी, ग्रामीण भागात सध्या 15 कन्टेंमेंट झोन असून या झोनमध्ये कोणीही फिरणार नाही याची ग्रामीण भागातील समितीने खबरदारी घेण्याचे सूचना त्यांनी केल्या. 8 मार्च ते 9 एप्रिलच्या कालावधीत प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय कॅम्प घेण्यात येणार आहेत.

पहिली बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे
रावेर तालुक्यात झालेल्या निवडणूकांमध्ये निवडणूक झालेल्या सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांची कोरोना व्हायरससंदर्भात पहिलीच बैठक घेण्यात आली. यावेळी गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांनी बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मार्गदर्शन केले.