कोरोना इफेक्ट : गर्दी ओसरल्याने आठ रेल्वेगाड्या रद्द

0

भुसावळ : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने प्लॅटफार्म तिकीट वाढवण्यासह गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. प्रवाशांची गर्दी कमी होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसात भुसावळ विभागातून धावणार्‍या 24 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर गुरुवारी पुन्हा आठ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे. दरम्यान, भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस अन्य गाड्या रद्द झाल्याने आरक्षण केलेल्या प्रवाशांचे आरक्षणदेखील रद्द झाले आहे.

प्रवाशांच्या कमी प्रतिसादामुळे गाड्या रद्द
अप 11025 व डाऊन 11026 भुसावळ-पुणे व पुणे-भुसावळत हुतात्मा एक्स्प्रेस ही 20 ते 31 मार्चदरम्यान रद्द करण्यात आली आहे. डाऊन 12071 व अप 12072 दादर-जालना व जालना-दादर जनशताब्दी एक्स्प्रेस ही 20 ते 31 मार्चदरम्यान रद्द करण्यात आली आहे. डाऊन 11083 लोकमान्य टिळक टर्मिनस-काझीपेठ ताडोबा एक्स्प्रेस व्हाया मनमाड एक्स्प्रेस 20 मार्च व 27 मार्च रोजी रद्द करण्यात आली आहे तसेच अप 11084 काझीपेठ-लोकमान्य टिळकटर्मिनस ताडोबा एक्स्प्रेस व्हाया मनमाड 21 व 28 मार्च रोजी रद्द करण्यात आली आहे. अप 02198 जबलपूर-कोईम्बतूर विशेष गाडी 21 व 28 मार्च रोज तसेच डाऊन 02197 कोईम्बतूर-जबलपूर विशेष गाडी 23 व 30 मार्च रोजी रद्द करण्यात आली आहे.

रेल्वे प्रशासनाकडून सवलती रद्द
रेल्वेत गर्दी टाळण्याच्या पार्श्‍वभूमीवर रेल्वे प्रशासनाने 20 मार्चपासून पुढील आदेश येईपर्यंत प्रवाशांना मिळणार्‍या ज्येष्ठ नागरीक, विधवा-परीतक्ता, स्वातंत्र्य सैनिक, पोलिस दल, स्पोटर्स खेळाडू आदी सुविधा रद्द करण्यात आल्या आहेत. असे असलेतरी दिव्यांसाठीची सवलत, दृष्टीहिन, मुका व बहिरा, कैंसरग्रस्त, थॅलेसिमीयाग्रस्त, टीव्ही, क्षयरोगी तसेच स्टुडंट पास आदी सुविधा मात्र मिळणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळवले आहे.