नवापूर: गर्भवती स्त्रीची बरीच काळजी घेतली जाते. तिला घराबाहेर जाऊ देत नाही. काम करू देत नाही. घरातील संपूर्ण कुटुंब गर्भवतीवर लक्ष ठेवून असते. विशेष खानपानची व्यवस्था केली जाते. दरम्यान नवापूर उपजिल्हा रुग्णालयातील परिचारिका गेंदू गावित वय 32 स्वतःच्या काळजीपेक्षा समाजासाठी रस्त्यावर उतरली आहे.
नवापूर शहरातील गल्लीबोळात जाऊन घरात बाहेर गावाहून कोणी व्यक्ती आल्याचा शोध घेत आहे. तसेच नागरिकांमध्ये कोरोना संदर्भात जनजागृती देखील करीत आहे. धक्कादायक बाब म्हणजे जिल्हा प्रशासनाने यांना पुरेसे मास्क देखील दिले नाही. मास्क संपल्याने तोंडाला रूमाल बांधून धोकादायक परिस्थितीत होम टू होम सर्वेक्षण करीत आहे.
महाराष्ट्र राज्यात कोरोना वाढता प्रादुर्भाव पाहता आरोग्य विभागाने कोरोनाशी दोन हात करण्यास कंबर कसली आहे. परंतू आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचा-यांना पुरेसे साहित्य का मिळत नाही. नंदुरबार आदिवासी जिल्हा आहे. या जिल्ह्यात एवढी परवळ का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.