कोरोना : पुढील 100 ते 120 दिवस अतिशय महत्त्वाचे – अजित पवार

पुणे – ज्या नागरिकांनी लशींचे दोन्ही डोस घेतलेत, त्यांनी टप्प्याटप्प्याने बाहेर पडायला सुरुवात केली पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. पण, अनेकांचं मत वेगवेगळं आहे, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरही वेगळं मत मांडत आहेत. काही मान्यवर असं मत माडतात की, इथून पुढे 100 ते 120 दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत. त्या, 120 दिवसांत आपल्याला अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. लोकांनी नियमांचं तंतोतंत पालन करायला हवं. मात्र, ग्रामीण भागात हे नियम पाळले जात नाहीत, मी नगर जिल्ह्यातील एका गावात गेलो होतो, तेथे मला नेहमीप्रमाणे वातावरण दिसलं, कुणीही मास्क घातला नव्हता, हा निष्काळजीपणा आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.

लसींची उपलब्धता होत नसल्याचे तुटवडा

लोकसंख्येच्या तुलनेनं लशींचा पुरवठा व्हायला हवा, उत्तर प्रदेश हे देशातील सर्वात मोठं राज्य आहे. त्यानंतर, बिहारपाठोपाठ महाराष्ट्राचा नंबर लागतो. त्यातुलनेत लशींचे वितरण होत नसल्याने लसीकरणात लशींचा तुटवडा होत असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं. जुलै महिन्यात लसींचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होईल असं आम्हाला सांगण्यात आलं होतं. पण, आज 21 तारीख असून आजपर्यंतही लस उपलब्ध झाली नाही. आपण दररोज 15 ते 20 लाख लोकांना दररोज लस देऊ शकतो, एवढी आपली क्षमता आहे. पुणे जिल्ह्यातच 1.5 लाखांपर्यंत लसीकरण होऊ शकतं. पण, तेवढी लशींची उपलब्धता झाली पाहिजे. विदेशातील लसींनाही मर्यादा पडतात, केवळ दोन लसींना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, आनंदाची बाब ही आहे की लस घेण्यासाठी लोकं पुढाकार घेत आहेत, स्वत:हून पुढे येत आहेत. जे सुरुवातीच्या काळात लसीपासून दूर पळत होते, असे अजित पवार यांनी म्हटले.