कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची आत्महत्या; जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

0

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे, मात्र त्याला यश येतांना दिसत नाही. नागरिकांमध्ये कोरोनाविषयी प्रचंड धास्ती आहे. दरम्यान एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने भीतीपोटी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे.

जिल्‍हा कोविड रूग्‍णालयात एका पॉझिटिव्ह रुग्णाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शासकिय वैद्यकिय महाविद्यालयातल्‍या जिल्‍हा कोविड रूग्‍णालयातील वॉर्ड क्रमांक सहामध्ये दाखल कडुबा नकुल घोंगडे (वय ५०, रा. पहूर, ता. जामनेर) या कोरोना बाधित रूग्‍णाने गळफास घेवून आत्‍महत्‍या केली. या घटनेवरून जिल्हा रुग्णालयाच्या कारभारावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. यापूर्वी देखील एका वृद्धेचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला होता, तब्बल पाच दिवस मृतदेह स्वच्छतागृहात असल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर आता एकाने आत्महत्या केल्याने त्यात अधिकच भर पडली आहे.

वॉर्डात छताला लटकणारा मृतदेह पाहून अन्य रूग्‍णांमध्ये धावपळ उडाली. त्‍यांनी बाहेर असलेल्‍या कर्मचाऱ्यांना सदर प्रकार सांगितल्‍यानंतर पोलिसांना बोलाविण्यात आले. घटनेचा पोलिस पुढील तपास करत आहेत.