कासारगोड: चीनमध्ये आधालेल्या कोरोना विषाणूची लागण संपूर्ण जगात झाली आहे. भारतातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. केरळमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. आता कोरोना विषाणूची लागण झालेला तिसरा रुग्ण आढळला आहे. केरळच्या कासारगोडमध्ये हा रुग्ण आहे अशी माहिती राज्याच्या आरोग्यमंत्री के.के.शैलजा यांनी दिली. भारतातील कोरोना विषाणूचा हा तिसरा रुग्ण आहे. याआधी कोरोनाची लागण झालेले दोन्ही रुग्ण केरळमधीलच आहेत.
तिसऱ्या रुग्णावर कासारगोडमधील कांजनगड जिल्ह्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. अलीकडेच हा रुग्ण चीनच्या वुहान शहरातून परतला होता. भारतात आढळलेले कोरोना विषाणूची लागण झालेले तिन्ही रुग्ण केरळमधील आहेत.
गुरुवारी थ्रिसूरमध्ये कोरोना विषाणूची लागण झालेला पहिला रुग्ण आढळला. कोरोना विषाणूमुळे चीनमध्ये आतापर्यंत ३५० जणांचा मृत्यू झाला असून, १४ हजार पेक्षा जास्त लोकांना याची लागण झाली आहे. भारत, अमेरिकेसह जगातील २५ देशांमध्ये या आजाराचा फैलाव झाला आहे.