कोरोना : भुसावळकरांवर आता ड्रोन कॅमेर्‍याची नजर

0

प्रशासन अ‍ॅक्टीव्ह मोडवर : नियम डावलून दुकान उघडणार्‍या दुकानदारांसह कंटेन्मेंट झोनमधून बाहेर पडणार्‍यांवर होणार कारवाई

भुसावळ : भुसावळातील कोरोनाबाधीत रुग्णांसह मृत रुग्णांचा आकडा सर्वाधिक असल्याने जिल्हाधिकार्‍यांनी नुकतीच अधिकार्‍यांची बैठक घेत तीव्र नाराजी व्यक्त करीत यंत्रणेवर ताशेरे ओढले होते तर नुकतीच आरोग्यमंत्र्यांनी भेट देत कोरोना नियंत्रणाबाबत यंत्रणेला सूचना केल्या होत्या. या पार्श्‍वभूमीवर पोलिस प्रशासनही अ‍ॅक्टीव्ह मोडवर आले असून आता भुसावळकरांवर नजर ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेर्‍याची मदत घेतली जाणार आहे. कन्टेमेंट झोनमधून बाहेर पडणार्‍या नागरीकांसह नियम मोडणार्‍या दुकानदारांवर या माध्यमातून कारवाई करणे शक्य होणार आहे.

ड्रोनच्या माध्यमातून होणार कारवाई
शुक्रवारी प्रशासनाकडून भुसावळसाठी तीन ड्रोन कॅमेरे प्राप्त झाले असून त्यातील दोन बाजारपेठ हद्दीत तर एक शहर हद्दीत वापरले जाणार आहेत. शहरातील विविध भागात कंटेन्मेंट झोन असलेतरी नागरीक व व्यापारी मात्र सर्रास नियमांचे उल्लंघण करून बाहेर पडत असल्याने अशांचे ड्रोनच्या माध्यमातून छायाचित्र टिपले जावून कारवाई केली जाणार आहे शिवाय शहरातील विविध ठिकाणी होणारी गर्दीदेखील त्यातून नियंत्रीत केली जाणार आहे तसेच ठरवून दिलेल्या दिवसा व्यतिरीक्त व्यापार्‍यांनी दुकाने उघडल्यास त्यांना थेट सील लावले जाणार आहे शिवाय सोशल डिस्टन्स न पाळणार्‍यांवर या माध्यमातून सहज कारवाई करता येईल, असे पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांनी ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना सांगितले.

पोलिस अधीक्षकांच्या सूचनांची अंमलबजावणी
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी गुरुवारी शहरातील कन्टेमेंट झोनची पाहणी करीत झोनमधून कुणीही आत वा बाहेर पडणार नाही, याची दखल घेण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या होत्या त्यानुसार कन्टेमेंट झोनवर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला असून शुक्रवारी डीवायएसपी गजानन राठोड यांनी पाहणी केली. दरम्यान, शुक्रवारी ड्रोनच्या माध्यमातून प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांनी संपूर्ण शहराची तसेच बाजारपेठेची पाहणी केली.