भुसावळ : शहरातील कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता मंगळवारी सुमारे चारशे नागरीकांचे स्वॅब आरोग्य विभागाने घेतल्याचे समजते तर बुधवारीदेखील अशाच पद्धत्तीने स्वॅब घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. सुमारे दिड महिन्यांपेक्षा अधिक काळापासून शहरात दररोज सातत्याने कोरोनाबाधीतांची संख्या वाढत असल्याने प्रशासनावरील ताण वाढला आहे तर भुसावळकरांची देखील चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागातर्फे मंगळवारपासून दोन ठिकाणी रॅण्डमली स्वॅब घेण्यास सुरुवात करण्यात आली.
म्युन्सीपलमध्ये घेतले 198 स्वॅब
शहरातील म्युन्सीपल स्कूलमध्ये पंचशील नगर, शनी मंदिर वॉर्ड आणि गंगाराम प्लॉट या भागातील 198 नागरीकांचे स्वॅब घेण्यात आले तर सकाळी दहा वाजेपासून दुपारी दोन वाजेपर्यंत ही प्रक्रिया चालली. दरम्यान, रमजान महिन्यामुळे मुस्लीम बांधवांचे उपवास असल्याने या परीसरातील रहिवाशांचे सायंकाळी रोजा इप्तार झाल्यावर (उपवास सोडल्यावर) शहरातील खडका रोड भागातील पालिकेच्या दवाखान्यात सुद्धा मंगळवारी सायंकाळी सातनंतर रॅण्डमली स्वॅब घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. बाधीत रुग्ण आढळलेल्या परीसरातील नागरीकांचे यात स्वॅब घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.