नवी दिल्लीः जगभरात हाहाकार उडवून देणार्या कोरोना व्हायरसबद्दल चीनने माहिती लपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अमेरिकेकडून वारंवार केला जात आहे. यापार्श्वभूमीवर चीनचे स्टेट काउंसिलर वांग यी यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी फोनवरून चर्चा केली. दोन्ही देशांमधील संवाद कायम आहे आणि कठीण काळात त्यांनी साथीला सामोरे जाण्यास एकमेकांना मदत केली आहे. भारताने चीनला वैद्यकीय पुरवठा केला आणि विविध मार्गांनी सहकार्य केले, असे म्हणत चीनने भारताचे आभार मानले. अमेरिकेने लावलेल्या आरोपांचे खंडन करून भारताने साथ द्यावी, अशी इच्छाही चीनच्या वांग यांनी व्यक्त केली. मात्र भारताने अशा परिस्थितीत या आरोप-प्रत्यारोपांहून दूर राहणंच पसंत केले आहे.
कोरोना व्हायरसनं पूर्ण जगाला विळख्यात घेतले आहे. अमेरिका याला चिनी व्हायरस आणि वुहान व्हायरस संबोधून यासाठी चीनला जबाबदार धरत आहे. चीनने या प्रकरणात भारताकडे मदत मागितली होती आणि अमेरिकेच्या या आरोपांचे खंडन करण्यास सांगितले होते. अमेरिका हा संकुचित विचारसरणीचा असल्याचे चीनचे म्हणणे आहे. याबाबत जयशंकर म्हणाले की, आम्ही याक्षणी चीनला अनुकूल किंवा विरोध करण्याच्या विचारात नाही. कोरोना विषाणूला अमुक एका देशाच्या नावाने संबोधण्यास आम्ही सहमत नाही. तसेच यावर भारताला काहीही बोलायचे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कोरोना विषाणू तयार केला नाही किंवा मुद्दाम पसरवला नाही – चीन
चीनने बुधवारी म्हटले की, त्याने कोरोना विषाणू तयार केला नाही किंवा तो मुद्दाम पसरवला नाही आणि ’चिनी व्हायरस’ किंवा ’वुहान व्हायरस’ असे म्हणणे चुकीचे आहे. चिनी दूतावासाचे प्रवक्ते जी रोंग म्हणाले की, आंतरराष्ट्रीय जनतेने चिनी लोकांकडे अन्यायपूर्वक पाहण्यापेक्षा साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी त्वरित पावले उचलावीत, यावर चीनच्या सरकारने भर दिला पाहिजे. या आजाराचा सामना करण्यासाठी भारत आणि चीन यांच्यात सहकार्याबद्दल ते म्हणाले की, दोन्ही देशांमधील संवाद कायम आहे आणि कठीण काळात त्यांनी साथीला सामोरे जाण्यास एकमेकांना मदत केली आहे. भारताने चीनला वैद्यकीय पुरवठा केला आणि विविध मार्गांनी सहकार्य केले. आम्ही त्यांचे कौतुक करतो आणि धन्यवाद देतो, असेही ते म्हणाले.