जळगाव: कोरोना विरुद्ध दोन हात करून कोरोना फायटरची भूमिका बजावणारे डॉक्टर्स ,नर्स ,पोलीस ,होमगार्ड ,सफाई-कामगार ,प्रशासकीय अधिकारी, पत्रकार या कोरोना योद्ध्यांप्रती कृतज्ञता व्यक्त व्हावी तसेच सामाजिक ऋणातून उतराई व्हावे या उद्देशाने जळगाव शहरातील शिक्षण तसेच सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोबेल फाऊंडेशनतर्फे कोरोना योद्ध्यांच्या 60 मुला-मुलींना अकरावी व बारावी या शैक्षणिक वर्षांसाठी तसेच मेडिकल, इंजिनिअरिंग, एनडीए प्रवेश परीक्षांसाठी सवलतीत प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी “नोबेल महाराष्ट्र रक्षक शिष्यवृत्ती योजना ” जाहीर करण्यात आली आहे. यासाठी ऑनलाईन परीक्षाद्वारे निवड चाचणी घेण्यात येईल.गरजेनुसार योजनेची व्याप्ती वाढविली जाईल.
उद्योगधंदे तसेच व्यवसाय बंद पडल्यामुळे मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी सुद्धा लोकांकडे पैसे नाहीत. या पार्श्वभूमीवर गरजू तसेच बेरोजगारीची झळ पोहचलेल्या कुटुंबातील पाल्यांना देखील या शिष्यवृत्तीद्वारा शिक्षण मिळणार आहे. ज्या पालकांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे तेसुद्धा या योजनेसाठी अर्ज करू शकतात. यासाठी नोबेल फाऊंडेशनच्या आयएमआर कॉलेज जवळील कार्यलयात अर्ज करावयाचा आहे. या योजनेद्वारे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण, पुस्तके, नोटबुक, शाळेचे कपडे ,शालेय साहित्य , शाळेची फी,तसेच परीक्षा फी अशी गरजेनुसार मदत दिली जाईल. यासाठी 9922004193 या क्रमांकावर संपर्क साधावा.
या शिष्यवृत्ती योजनेसाठी भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशन, भरारी फाऊंडेशन, दीपस्तंभ बहुद्देशीय संस्था , स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल अमळनेर , पुखराज पगारिया फाउंडेशन , सुकृती पिनॅकल हौसिंग सोसायटी, लक्ष्मी ऍग्रो व ग्रीनस्टार, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी बांभोरी यांचे सहकार्य लाभत आहे.
शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन नोबेल फाऊंडेशनचे अध्यक्ष जयदीप पाटील यांनी केले आहे.