नंदुरबार:जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमार्फत जिल्हाभरात कोरोना (covid-19) या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अहोरात्र प्रयत्न सुरू असून, राज्य व केंद्र शासनाने दिलेल्या सूचनांचा अवलंब करून जिल्ह्यातील नागरिकांना कोरोनापासून बचावा बरोबरच रोजगार उपलब्ध करून देणे, गावागावात स्वच्छता ठेऊन, निर्जंतुकीकरण प्रक्रिया राबविणे, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देणे, अशा विविध कामांचा समावेश आहे. कोरोना (Covid-19) आजाराच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने महामारी घोषित केली असून, या संकटावर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेचे विविध विभागाचे कर्मचारी अहोरात्र मेहनत घेऊन जीवाची पर्वा न करता काम करत आहेत. कोरोनाशी लढणाऱ्या संपूर्ण् यंत्रणेला “कोरोना (कोविड-19) योद्धा“ असे संबोधून या योध्यांसाठी सानुग्रह अनुदान म्हणून 25 लक्ष रुपये मदत देण्यात येईल, अशी घोषणा नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲड. कु. सीमा पद्माकर वळवी यांनी पत्रकार परिषदेत केली.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर माहिती देण्यासाठी नंदुरबार जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा जी.सी., उपाध्यक्ष ॲड. राम रघुवंशी, बांधकाम समिती सभापती अभिजित पाटील, आरोग्य व शिक्षण समिती सभापती जयश्री पाटील, समाजकल्याण समिती सभापती रतन पाडवी, महिला व बालकल्याण समिती सभापती निर्मला राऊत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) भूपेंद्र बेडसे यांच्यासह पदाधिकारी व विभागप्रमुख उपस्थित होते.
यावेळी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देतांनाच पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यात आली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा म्हणाले, कोरोना (कोविड19) या विषाणूचा प्रादुर्भाव आपल्या जिल्ह्यात होऊ नये, यासाठी जिल्हा परिषद अंतर्गत येणारे आरोग्य विभागाचे कर्मचारी, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी कार्यकर्त्या, अंगणवाडी मदतनीस, आशा कार्यकर्त्या या सर्वांच्या माध्यमातून जनतेमध्ये जनजागृती करणे, स्वच्छता मोहीम राबविणे, आरोग्याची काळजी घेणे, अशी विविध कामे केली जात आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक गावात निर्जंतुकीकरणासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून फवारणी करून घेण्यात आली आहे. अनेक ग्रामपंचायतींनी गावातील नागरिकांना मास्क व सॅनीटायझर वाटप केले आहे. जिवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरळीत करणे, गावांत ग्रामरक्षक दलाची स्थापना करणे तसेच रोजगार हमी योजने अंतर्गत कामे सुरु करणे, स्वस्तधान्य धान्य दुकानांच्या माध्यमातुन जिवनावश्यक वस्तुचा सुरळीत पुरवठा करणे, अशी विविध कामे केली जात आहेत. यासाठी संपूर्ण जिल्हा परिषद यंत्रणा वेगवेगळ्या पद्धतीने अहोरात्र काम करत आहे.