कोरोना लॉकडाऊन ; चोरट्यांचा रोकडसह धान्य, जीवनावश्यक वस्तूंवर डल्ला

0

जळगाव : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जिल्हयात लॉकडाऊन आहे. त्यामुळे सर्वत्र घरांमध्ये नागरिक आहेत. त्यामुळे घरे सोडून चोरट्यांनी दुकानांकडे मोर्चा वळविल्याचे समोर आले आहे. शहरातील दाणाबाजारात भुसार मालाचे होलसेल दुकान फोडून चोरट्यांनी 11 हजार रूपयांची रोकडसह धान्य व जीवनावश्यक वस्तू चोरून नेल्याचा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला.

दाणाबाजारातील पोलन पेठ येथे केशरीमल रामदयाल राठी यांचे भुसार मालाचे होलसेल दुकान आहे. लॉकडाऊन असल्याने राजेश नंदलाल राठी (दिक्षीतवाडी ) यांनी मार्च महिन्यापासून दुकान बंद ठेवले आहे. त्याचे बंधू मनिष राठी यांनी सोमवारी सकाळी दुकान उघडले. दुकानातील कामगार नितीन वाणी आतमध्ये साफसफाईचे काम करत असतांना दुकानाच्या मागच्या बाजूला असलेले लाकडी दरवाजाचा कडी कोयंडा निघालेला दिसून आला. त्यानंतर दुकानातील ड्रावरमधून 11 हजारांची रोकड तसेच दुकानातील तेल, तुपाचे डबे तसेच अन्य जीवनावश्यक वस्तूंवर चोरट्यांनी डल्ला मारल्याचे लक्षात आले.

ब्रिटीशकालीन लोखंडी तिजोरी उघडलीच नाही

विशेष हे की,दुकानात असलेले ब्रिटीशकालीन लोखंडी लॉकर देखील चोरट्यांनी उघडण्याचा प्रयत्न केला आहे. या लॉकरचा लोखंडी हॅण्डल चोरटयांनी तोडला परंतु लॉकर उघडले नाही. घटनेची माहिती कळताच शनिपेठ तसेच शहर पोलिसांनी दुकानात धाव घेत पाहणी करून पंचनामा केला. या प्रकरणी पोलिसात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.