कोरोना विषाणूपासून होणार बचावासाठी बनवले ‘फेसशिल्ड’

0

भुसावळ : देशभरात कोरोना विषाणू बाधीतांच्या संख्येत वाढ होत असताना आहे. या पार्श्‍वभूमीवर कोरोनाच्या विषाणूपासून बचाव होण्यासाठी भुसावळ येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील रोबोटिक्स मधील विश्वविख्यात ब्लँका बॉट्स संघाच्या अक्षय जोशी, भूषण गोर्धे, विनय चौधरी, शाहबाझ गवळी, रोहित चौधरी, शुभम झांबरे यांच्यासह 40 विद्यार्थ्यांनी सार्वजनिक ठिकाणी वावरणार्‍या आणि थेट कोरोनाबाधित व संशयित व्यक्तींशी संपर्क येणार्‍या व्यक्तींसाठी फेस शिल्ड बनवले आहे. या फेस शील्डमुळे कोरोनाचे विषाणू संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचणार नसल्याचा दावा करण्यात आला आहे. यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह, डीन डॉ.राहुल बारजिभे, डॉ.गिरीश कुलकर्णी, प्रा.नितीन खंडारे, प्रा.धिरज पाटील यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले.

संपूर्ण चेहर्‍याचे होणार संरक्षण -अक्षय जोशी
कोरोना विषाणूने जगातील अनेक देशात प्रवेश केला असून हजारो लोक त्यामुळे मृत्युमुखी पडले आहेत. कोरोना विषाणू हवेवाटे पसरत असल्याचे स्पष्ट झाले आहे त्यामुळे शिंकल्यावर, खोकल्यावर तोंडावर मास्क किंवा रुमाल बांधण्याचा सल्ला दिला जातो. वारंवार चेहर्‍याला हात न लावण्याच्या सूचनाही तज्ज्ञांनी दिल्या आहेत. त्यातच मास्कने फक्त तोंडाला संरक्षण मिळते त्यामुळे बाकी चेहर्‍याच्या भागाला संरक्षण मिळावे म्हणून फेस शिल्ड बनवण्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण चेहर्‍याचे संरक्षण होणार आहे, असे इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकॉम विभागाचा विद्यार्थी व ब्लँका बॉट्स संघाचा संघनायक अक्षय जोशी याने सांगितले.

कमी खर्चात दीर्घकाळ टिकणार
हे शिल्ड कमीत कमी खर्चात आणि दिवसात बनवले आहे. हा फेसशिल्ड वजनाने हलका असून दीर्घ काळ याचा वापर करता येऊ शकतो. हे फेसशिल्ड बायोडीग्रेडेबल आहेत. दररोज 50 फेसशिल्ड तयार करण्यात येत आहेत. हे शिल्ड पोलीस, डॉक्टर आणि वैद्यकीय सहाय्यकांना उपयुक्त ठरणार आहे म्हणून सुरुवातीला विभागीय पोलीस आयुक्त गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील पोलिसांना वाटप करण्यात आले.

विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक
जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे व पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांनी भावी अभियंत्यांच्या कोरोना विरोधात सुरू असलेल्या लढ्यात सहभागी होऊन योगदान देण्याच्या कार्याचे कौतुक केले आहे. हिंदी सेवा मंडळाचे अध्यक्ष जे.टी.अग्रवाल, सचिव मधूलता शर्मा, कोषाध्यक्ष महेश दत्त तिवारी व समस्त हिंदी सेवा मंडळ पदाधिकार्‍यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.