कोरोना विषाणूमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बांगलादेश दौरा रद्द

0

नवी दिल्ली: कोरोना विषाणूमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बांगलादेश दौरा रद्द करण्यात आला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे अनेक आंतरराष्ट्रीय परिषदा रद्द करण्याची वेळ आली आहे. बांगलादेशमध्ये शेख मुजीब उर रहमान यांच्या शताब्दी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार होते. कोरोन विषाणूमुळे हा सोहळा रद्द केल्याची माहिती बांगलादेश सरकारने दिली. यामुळे पंतप्रधान मोदींनी त्यांचा बांगलादेश दौरा रद्द केला आहे.

पंतप्रधान मोदी १७ मार्चला बांगलादेशला जाणार होते. मात्र कोरोनामुळे त्यांना हा दौरा रद्द करावा लागला आहे. शेख मुजीब उर रहमान यांच्या जयंती निमित्त आयोजित केलेला शताब्दी सोहळा रद्द करण्यात आल्याची माहिती सोहळ्याच्या आयोजन समितीचे अध्यक्ष कमाल अब्दुल चौधरी यांनी दिली. कालच बांगलादेशमधल्या तिघांच्या कोरोनाच्या चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले. हे तिघेही नुकतेच इटलीहून परतले होते.

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना कोणत्याही सार्वजनिक सभेशिवाय शेख मुजीब उर रहमान यांच्या जयंती निमित्त आयोजित शताब्दी सोहळ्याचं उद्घाटन करणार आहेत. कोरोनाचा धोका लक्षात घेता या सोहळ्याचं स्वरुप अतिशय मर्यादित ठेवण्यात आलं आहे. शेख हसीना यांनीच मोदींना या सोहळ्याचं निमंत्रण दिलं होतं. रहमान बांगलादेशाचे संस्थापक असून त्यांना बांगलादेशचे राष्ट्रपिता संबोधलं जातं.