असलोद: नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे कोरोनो बाधीत एक रुग्ण आढळुन आल्याने ग्रामीण भागातील जनता अधिक सर्तक झाली आहे.त्यासाठी प्रत्येक गाव आपआपल्या परीने निर्णय घेत आहे. अशातच शहादा तालुक्यातील असलोद ग्रामपंचायतीने व सर्व नागरिकांनी आपल्या गावात बाहेरील कोणत्याही नातेवाईकांना न बोलविण्याचा निर्णय घेतला आहे. गावात बाहेर गावातील विनाकारण फिरणार्यांना गावबंदी करण्यात आली आहे. ग्रामस्थांसह ग्रामपंचायतीने गावात येणारे सर्व रस्ते बंद करुन अत्यावश्यक शासनाने परवानगी दिलेली वाहने सोडुन सर्व वाहनांना गावाबाहेरील रस्त्यावरुन जाण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. सर्व वाहने आता पिंपर्डे रस्त्यापासून पोलीस स्टेशनमार्गे गावाच्या बाहेरुनच काढण्यात आली आहेत. कोरोनोपासून बचावासाठी कठोर निर्णय घेऊन असलोदच्या नागरिकांना दंवडीद्वारे वारंवार सूचना दिल्या जात आहे.
गावात येणारे सर्व रस्ते बंद
असलोद गावातील मजुरांना बाहेरगावी कामाला न जाता त्यांनी गावातील शेतकर्यांकडे जावे, बाहेर गावातील मजुरांना शेतकर्यांनी बोलवु नये, बाहेर गावातील नातेवाईकांना बोलवु नये व आपणही बाहेरगावी जावु नये, गावात अवैध दारु विक्री कोणीही करु नये, अवैध दारु ज्या ठिकाणी विकली जाईल तेथे बाहेर गावातील नागरिक सायंकाळी अवैधरित्या दारु पिण्यासाठी आला तर त्याला ग्रामपंचायतमार्फत पोलिसांच्या स्वाधीन करणे, सकाळ व सायंकाळ गावातील नागरिक कामे नसताना बस स्टॉपजवळ बसताना दिसल्यास त्यांच्यावर कार्यवाही करणे, त्यांनी जर नाही ऐकले तर पाचशे रुपये दंड करण्यात येईल असे निर्णय घेवुन गावात दंवडी दिली जात आहे.शासनाने जोपर्यंत लॉकडाऊन जाहीर केले आहे, तोपर्यत गावात येणारे सर्व रस्ते बंदच राहतील. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय गावात कोणीही येवु नये व आपल्या गावातील नागरिकांनी त्याचे अत्यावश्यक काम नसेल तर त्यांनी दुसर्या गावात प्रवेश करु नये, अशा सुचना देण्यात आल्या आहेत.