नवी दिल्ली – हैदराबाद येथील भारत बायोटेक या जैवतंत्रज्ञान कंपनीने करोना संसर्गावर नाकावाटे देण्याची लस तयार करण्याचे काम सुरू केले आहे. या लशीचे नाव ‘कोरो फ्लू’ असे ठेवण्यात आले आहे. या लशीचे एकूण तीस कोटी डोस जगात वितरित केले जाणार आहेत.
करोनावर उपचार पद्धती विकसित करण्यासाठी जोरात काम सुरू असून सार्स सीओव्ही २ म्हणजे करोना विषाणू मानवी पेशीत ज्या दरवाजांनी प्रवेश करतो ते बंद करण्यासाठी एक अभिनव उपचार पद्धती विकसित केली जात आहे. ‘सेल’ या नियतकालिकात प्रसिद्ध संशोधनानुसार सार्स सीओव्ही २ विषाणूला पेशींमध्ये प्रवेश नाकारण्याच्या दिशेने प्रयत्न केले जात आहेत. कॅनडातील ब्रिटिश कोलंबियाचे जोस पेनिंगर यांनी म्हटले आहे की, यातील निकाल उत्साहवर्धक असून संबंधित औषध रक्तवाहिन्या व मूत्रपिंडावर कसा परिणाम करते याचीही माहिती उपलब्ध आहे. एसीई २ हे पेशींवरील प्रथिन सध्या या विषाणूच्या प्रवेशास कारण ठरत आहे. सार्स सीओव्ही २ या विषाणूवरील ग्लायकोप्रोटिनची ओळख एसीई २ प्रथिनामुळे पटवली जाते व विषाणू पेशीत घुसून थैमान घालतो असे दिसून आले आहे. २००३ मध्ये सार्स सीओव्ही १ विषाणूतही ग्लायकोप्रोटिनची ओळख एसीई २ प्रथिनामुळे पटून तो विषाणू पेशीत घुसण्यात यशस्वी होत होता. कुठल्याही विषाणूरोधक औषधात नेमकी विषाणूची पेशीत घुसण्याची क्रिया रोखली जात असते. यात एपीएन ०१ या औषधाने हवा तो परिणाम साधला जातो.