नवी दिल्ली- कोर्टाचा अवमान (कंटेंम्प ऑफ कोर्ट)केल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने सीबीआयचे माजी संचालक नागेश्वर राव यांना आज मंगळवारी दणका दिला. कोर्टाने त्यांना दोषी ठरवत त्यांना एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
मुझफ्फरपूर जिल्ह्यातील वसतीगृहात राहणाऱ्या मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार गेल्या वर्षी समोर आला होता. या प्रकरणाचा सीबीआयकडून तपास सुरु आहे. सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली या प्रकरणाचा तपास सुरु आहे. या प्रकरणातील तपास अधिकाऱ्यांची बदली करु नये, असे स्पष्ट निर्देश सुप्रीम कोर्टाने यापूर्वी झालेल्या सुनावणीत दिले होते. मात्र, यानंतरही या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआय अधिकाऱ्याची बदली करण्यात आली होती. यासाठी तत्कालीन संचालक नागेश्वर राव यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले होते.