कोर्टाचा निर्णय कोर्टात होईल, सरकार म्हणून तुम्ही उत्तर द्या!

0

मुंबई। भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी आज विधानसभेत आक्रमक भूमिका घेत राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना चांगलेच अडचणीत आणले. भूसंपादनाबाबतचे 1995 सालचे परिपत्रक जिवंत आहे की नाही हे सांगा हा प्रश्न लावून धरत उदयोगमंत्री सुभाष देसाई यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी उत्तरात मंत्र्यांनी कोर्टाचा उल्लेख करताच कोर्टाचा निर्णय कोर्टात होईल सरकार म्हणून तुम्ही उत्तर द्या असे म्हणत खडसे यांनी आपल्याच सरकारला धारेवर धरले. अखेर, देसाई यांच्या मदतीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धाव घेत विधि व न्याय विभागाकडून याबाबतची माहिती घेऊन सभागृहात ठेवू असे आश्वासन दिले.

1995 सालचे परिपत्रक असून हे परिपत्रक जिवंत आहे की मेले
भूसंपादन केल्यानंतर तीन वर्षांत भूसंपादन प्रक्रिया झाली नाही तर भूसंपादन रद्द होते असे सरकारचे 1995 सालचे परिपत्रक असून हे परिपत्रक जिवंत आहे की मेले असा प्रश्न एकनाथराव खडसे यांनी उदयोगमंत्री सुभाष देसाई यांना केला. त्यावर उदयोगमंत्र्यांनी भोसरी एमआयडीसी प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्याने यावर अधिक भाष्य करू शकत नाही असे सांगितले. त्यावर खडसे यांनी तुम्ही उत्तर देउच शकत नाही. सरकारने काढलेले परिपत्रक रद्द झाले की अस्तित्वात आहे? कोर्टाचा काय संबंध असे म्हणत सरकारची कागदपत्रे मान्य नसतील तर मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावे असे खडसे म्हणाले. तेव्हा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे परिपत्रक अस्तित्वात आहे की नाही याची विधि व न्याय विभागाकडून माहिती घेऊन ते सभागृहासमोर ठेवण्यात येईल असे सांगितले.

बिल थकले तर व्याज माफ करा
तर, उर्जाविभागाच्या मागण्यांवरून उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना धारेवर धरत आपण विदर्भाचेच उर्जामंत्री आहात काय ? विदर्भात कृषिपंपांना वीज मिळते. इतर भागात का नाही मिळत असा सवाल केला. शेतकर्‍यांचे वीज बिल थकले असेल तर व्याज माफ करा, दंड माफ करा वीज कापणार नाही असा निर्णय घोषित करा अशी मागणी खडसे यांनी केली.

वीजदरवाढ सरकार करत नाही, मुळात कोणतीही वीजदरवाढ झालेली नाही, असं स्पष्टीकरण राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे. भाजपमधील सर्वात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी भर विधानसभेतच सरकारची कानउघडणी केली. त्यानंतर बावनकुळेंनी स्पष्टीकरण दिलं आहे. मी विदर्भातील मंत्री म्हणून जास्त बघतो हा आरोप चुकीचा असे बावनकुळे म्हणाले. उत्तर, पश्चिम महाराष्ट्राला वीज कनेक्शन देणार नाही, असं नाही. जळगाव जिल्हा आणि शहरासाठी वेगवेगळ्या योजनांमधून आपण निधी देत असल्याचंही बावनकुळे म्हणाले. जून 2017 पर्यंत जळगावमधल्या पायाभूत सुविधा पूर्ण करुन खडसेंच्याच हस्ते उद्घाटन करण्याचं आश्वासन त्यांनी दिले.