पुणे : शिवाजीनगर कोर्टातील सुनावणीसाठी आणलेल्या येरवडा जेलमधील दोन कैद्यांनी नातेवाइकांना भेटू न दिल्याच्या रागातून पोलीस कर्मचार्याला मारहाण करून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.17) दुपारी 1.45 वाजता घडला. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
अन्वर राजू शेख (19) आणि आकाश गौतम शिंदे (19) अशी या कैद्यांची नावे आहेत. याप्रकरणी शिवाजीनगर मुख्यालयातील सहाय्यक पोलीस फौजदार सर्फराज खान यांनी फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादींनी आरोपींना शिवाजीनगर सेशन कोर्टात सुनावणीसाठी हजर केले होते. सुनावणीनंतर त्यांना लॉकअपमध्ये परत घेऊन जात असताना पोलीस शिपाई मुल्ला यांनी नातेवाइकांना भेटू न दिल्यामुळे ते त्यांच्या अंगावर धावून जात होते. त्यावेळेस फिर्यादी आणि त्यांच्या सहकार्यांनी सोडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी धक्काबुक्की केली व पळून जाण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एम.पी.निंबाळकर अधिक तपास करीत आहेत.