कोर्ट चौकात अ‍ॅडव्होकेट अ‍ॅमेंडमेंट बिलाची होळी

0

जळगाव। वकीलांच्या संदर्भात असलेल्या अ‍ॅडव्होकेट अ‍ॅक्ट मध्ये या वर्षी केंद्र शासनाने काही दुरूस्ती केल्या आहेत. त्या दुरूस्ती अन्यायकारक असल्याचे सांगून त्याचा निषेध करीत जिल्हा वकील संघातर्फे शुक्रवारी दुपारी 2.15 वाजेच्या सुमारास कोर्ट चौकात अ‍ॅडव्होकेट अ‍ॅमेंडमेंट बील 2017 ची होळी करण्यात आली. तसेच यामध्ये लवकरच दुरुस्ती करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच दुपारनंतर वकीलांनी कामबंद आंदोलन पुकारले.

25 पैकी केवळ 10 वकील असणार
केंद्र शासनाने वकीलांच्या अ‍ॅडव्होकेट अ‍ॅक्टमध्ये काही दुरूस्ती सुुचविल्या आहेत. त्यात वकीलांच्या शिस्तपालन समितीमध्ये यापुर्वी केवळ वकीलच असायचे, मात्र नवीन दुरूस्ती नुसार त्यात 25 पैकी केवळ 10 वकील असणार आहेत. तर उर्वरीत 15 सदस्य हे इतर क्षेत्रातील म्हणजे सामाजीक, वैद्यकीय, व्यापार, उद्योग या क्षेत्रातील असणार आहेत. तसेच समितीत वकीलांची नेमणूक करण्याचे अधिकारही उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना असणार आहेत. या पुर्वी निवडणुकीद्वारे सदस्यांची निवड होत होती. तसेच वकिलाच्या चुकीमुळे जर एखादा खटला हरला. तर पक्षकाराला वकीलाने 5 लाखांपर्यंत नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. या सारख्या 10 दुरूस्ती प्रस्तावीत आहेत. त्या दुरूस्ती अन्याय कारक असल्याने त्याचा निषेध करून बीलाची होळी करण्यात आली. दुपारच्या सत्रात वकीलांनी कामबंद आंदोलन पुकारले.