कोलंबियाचा संघ भारतात दाखल

0

नवी दिल्ली । भारतात 6 ऑक्टोबरपासून सुरु होणार्‍या 17 वर्षाखालील फिफा विश्‍वचषक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोलंबियाचा संघ भारतात दाखल झाला आहे. या स्पर्धेसाठी भारतात येणारा हा पहिला परदेशी संघ आहे. स्पर्धेतील अ गटात समावेश करण्यात आलेला कोलंबियाचा संघ 15 दिवस आधीच भारतात आला आहे. कोलंबियाचा संघ दिल्लीमध्ये दोन आणि नवी मुंबईमध्ये साखळी लढतीतील एक सामना खेळणार आहे.

राजधानीत आल्यावर माध्यमांशी संवाद साधताना कोलंबियाचे मार्गदर्शक ओलार्डो रेस्ट्रेपो म्हणाले की, भारतात येऊन आनंद होतोय. आमचे खेळाडू, स्टाफ स्पर्धेत खेळण्यासाठी पुर्णपणे तयार आहेत. स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करु.लॉस कॅफेटेरॉस म्हणून ओळखल्या जाणार्‍या कोलंबियाच्या राष्ट्रीय संघाची 17 वर्ष गटाच्या फिफा विश्‍वचषक स्पर्धेत खेळण्याची ही सहावी वेळ आहे. मात्र विश्‍वचषक स्पर्धांच्या मागील तीन सत्रांमध्ये कोलंबियाचा संघ सहभागी झाला नव्हता.कोलंबियाचा ज्युनियर संघ नायजेरियात 2009 मध्ये झालेल्या स्पर्धेत खेळला होता.

कोलंबियाच्या संघाने यावर्षाच्या सुरुवातीला दक्शिण अमेरिकेच्या 17 वर्षाखालील लढतींमध्ये तिसरे स्थान मिळवून विश्‍वचषक स्पर्धेचे तिकीट पक्के केले होते. स्पर्धेचे संचालक झेव्हियर सेप्पी म्हणाले की, कोलंबियाचा संघ भारतात प्रथम आल्यामुळे खूश आहोत. त्यामुळे आता स्पर्धेला काही दिवसच शिल्ल क राहिले असल्याची जाणिव झाली. कोलंबियाशिवाय 22 अन्य संघ येत्या दोन आठवड्यात विश्‍वचषक स्पर्धेसाठी भारतात येतील.