दुबई । श्रीलंकेविरुद्धच्या कोलंबो कसोटीत जबरदस्त कामगिरी करणार्या भारताच्या रवींद्र जडेजाने आयसीसीच्या अष्टपैलु खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. कोलंबो कसोटीत जडेजाने केलेल्या दुहेरी कामगिरीच्या जोरावर भारताने श्रीलंकेचा एक डाव 53 धावांनी मोठा पराभव केला होता. या कामगिरीच्या जोरावर जडेजाने बांगलादेशाच्या शाकिब अल हसनला मागे टाकत सर्वोच्च स्थान मिळवले. याशिवाय जडेजाने आयसीसीच्या गोलंदाजांच्या क्रमवारीतले अव्वल स्थान कायम राखले आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या मानांकनात जडेजाचे 438 गुण आहेत, तर शाकिबच्या नावावर 431 गुण जमा आहेत. योगायोगाने ज्या सामन्यातल्या कामगिरीमुळे जडेजाला अष्टपैलू खेळाडूंमध्ये आघाडीचे स्थान मिळाले त्याच सामन्यात आयसीसीच्या नियमांचे उल्लंघन केले. म्हणून जडेजावर एका सामन्याच्या बंदीची कारवाई करण्यात आली आहे.
कोलंबोतील दुसर्या कसोटीत जडेजाने नाबाद 70 धावा आणि सात विकेट्स मिळवल्या होत्या. त्यानंतर त्याने दुसर्या डावात पाच विकेट्स मिळवत संघाच्या विजयात मोलची भूमिका बजावली होती. फलंदाजांच्या क्रमवारीत जडेजाला नऊ क्रमांकाचा फायदा मिळाला असून आता तो 51 व्या क्रमांकावर आला आहे. भारताचा यष्टिरक्षक वृद्धिमान सहाने फलंदाजांच्या क्रमवारीत आता 46 व्या स्थानावर झेप घेतली आहे. याआधी तो 48 व्या स्थानावर होता. वृद्धिमान सहाचे हे कसोटीमधील आतापर्यंतचे सर्वोत्तम मानांकन आहे.
चेतेश्वर पुजारा फलंदाजीत तिसरा
कोलंबोतील कसोटीत शतक ठोकणार्या चेतेश्वर पुजाराला (888 गुण) आयसीसीच्या फलंदाजीच्या क्रमवारीत एका स्थानाचा फायदा मिळाला आहे. पुजारा आता तिसर्या स्थानावर आला आहे. भारतीय कर्णधार विराट कोहली (813 गुण) पाचव्या क्रमांकावर आहे. स्टीव्हन स्मिथ आणि ज्यो रूट या क्रमवारीत अनुक्रमे पहिला आणि दुसरा क्रमांक राखून आहेत. दुसर्या कसोटीत शतकी खेळी केल्याचा फायदा अजिंक्य रहाणेला मिळाला आहे. रहाणेने आता 11 व्या क्रमांकावरून थेट सहाव्या स्थानावर उडी मारली आहे. सलामीचा फलंदाज लोकेश राहुल 737 गुणांसह 11 व्या क्रमांकावर आहे.
रवीचंद्रन अश्विन घसरला
गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताच्या रवीचंद्रन अश्विनच्या मानाकंनात घसरण झाली आहे. अश्विन (842) नवीन क्रमवारीत तिसर्या स्थानावर आला आहे. या क्रमवारीत जडेजाच्या पाठोपाठ जिमी एंडरसन दुसर्या स्थानावर आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी 20 व्या आणि उमेश यादव 22 व्या स्थानावर आहे. इंग्लंडचा अष्टपैलू मोईन अलीही द. आफ्रिकेविरुद्धच्या कामगिरीमुळे फलंदाजांच्या क्रमवारीत 21 व्या, गोलंदाजांच्या यादीत 18 व्या आणि अष्टपैलु खेळाडुंमध्ये चौथ्या क्रमांकावर आला आहे. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत 250 धावा आणि 25 विकेट्स मिळवणारा तो पहिला क्रिकेटपटू आहे. आफ्रिकेच्या मॉर्ने मॉर्केलसह मोईनला मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवण्यात आले.