मुंबई । पेशावर झल्मी संघाने पीपीएलचे जेतेपद पटकावली आहे. पाकिस्तान प्रिमियर लीगमधील (पीपीएल) पेशावर झल्मी संघाबरोबर ट्वेन्टी-20 मालिका खेळण्याची इच्छा आयपीएलसंघातील कोलकत्ता नाईट रायडर्सचा मालक शाहरूख खान याने व्यक्त केली आहे. पेशावर झल्मी संघाचा मालक जावेद आफ्रिदीकडे शाहरूखने याबाबतची विचारणा देखील केली आहे. शाहरुखने पेशावर झल्मी संघाला शुभेच्छा देत आगामी काळात कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध ट्वेन्टी-20 मालिका खेळवण्याची इच्छा व्यक्त केली.
भारत आणि पाकिस्तानच्या सरकारने परवानगी दिल्यास दोन्ही संघांमध्ये ट्वेन्टी-20 मालिकेचे आयोजन करता येईल. जावेद अफ्रिदी यांनी याबाबतची माहिती तेथील पत्रकाराशी बोलताना दिली. दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण असले तरीसुद्धा एका तटस्थ ठिकाणी मालिकेचे आयोजन नक्कीच करता येईल, असे जावेद आफ्रिदीचे म्हणणे आहे. भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास याआधीच नकार दिला आहे. याआधी 2007 साली भारत-पाकिस्तान संघामध्ये कसोटी सामना खेळविण्यात आला होता. अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घानी, शाहरुख खान, संजय कपूर आणि गुलशन ग्रोवर या सर्वांनी आपल्याला फोनवरून पीपीएलच्या स्पर्धेचे जेतेपद पटकावल्याबद्दल शुभेच्छा दिल्याचे जावेद आफ्रिदीने सांगितले. कोलकाता नाईट रायडर्स आणि पेशावर झल्मी यांच्यातील ट्वेन्टी-20 मालिकेसाठी मी भारत सरकारकडे विनंती करेन, तू पाकिस्तान सरकारकडे विचारणा कर, असे शाहरुखने आपल्याला फोनवर कळवल्याचे आफ्रिदीने सांगितले.