जयपूरः काल राजस्थान आणि कोलकाता यांच्यात सामना झाला. यात कोलकाताने राजस्थानवर मात करत गुणतालिकेत बढत मिळविली. सलामीवीर ख्रिस लीन आणि सुनील नारायण यांच्या तडाखेबाज खेळीच्या जोरावर कोलकाताने राजस्थानवर ८ गडी राखून मात केली आहे. हॅरी गर्ने याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
राजस्थानने कोलकत्यासमोर विजयासाठी १४० धावांचे आव्हान ठेवले होते. सलामीवीर ख्रिस लीन आणि सुनील नारायण यांनी राजस्थानच्या गोलंदाजांचा समाचार घेत कोलकाताला विजयी पथावर नेले. या दोघांनी केलेल्या फटकेबाजीला रोख लावण्यात राजस्थान अपयशी ठरले. संघाची धावसंख्या ९१ वर असताना कोलकाताला पहिला धक्का बसला. सुनील नारायण ४७ धावांवर बाद झाला. एका बाजूला फटकेबाजी सुरू ठेवत ख्रिस लीनने ३२ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. ३२ चेंडूंमध्ये केलेल्या ५० धावांमध्ये ६ चौकार आणि ३ खणखणीत षटकारांचा समावेश होता. अर्धशतक पूर्ण करूनही कोलकाताला विजयी सीमेपर्यंत लीन पोहोचू शकला नाही. तो ५० धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या रॉबिन उथप्पा (२६) आणि शुभमन गिल (६) यांनी कोलकाताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. राजस्थानकडून श्रेयस गोपालने २ बळी टिपले.