नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सी.एस.कर्णन हे बेपत्ता झाले आहेत. मंगळवारी पहाटे साडेचार वाजता चेन्नई येथे जाण्यासाठी त्यांनी कोलकाता येथील आपले निवासस्थान सोडले होते. दुपारी ते चेन्नईला पोहोचल्यानंतर काही वेळातच ते बेपत्ता झाले आहेत. सध्या न्या. कर्णन हे कोठे आहेत, याची माहिती कोणाकडेच नसल्याचे समजते आहे.
न्यायमूर्ती कर्णन हे बिधाननगर पोलिसांच्या एका टीमबरोबर विमानतळावर गेले. सकाळी 6.30 वाजता इंडिगो विमानाने ते कोलकाताहून चेन्नईला रवाना झाले. त्यानंतर सुमारे सहा तासानंतर सर्वोच्च न्यायालयाने कर्णन यांना न्यायालयीन अवमानाच्या प्रकरणात दोषी ठरवत 6 महिन्यांची तुरूंगवासाची शिक्षा सुनावली. चेन्नईत पोहोचेपर्यंत कर्णन यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची माहिती समजली होती. निर्णयाच्या एक तासानंतर त्यांनी चेन्नईतील विश्रामगृहात पत्रकारांशी चर्चा केली आणि मुलाखतही दिली.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कर्णन हे आपल्या ग्रीनवेज रस्त्यावरील घरी नाहीत. कोलकाता उच्च न्यायालयात त्यांची बदली होऊन एक वर्ष झाल्यानंतरही त्यांनी हे घर सोडले नव्हते. त्यांच्यासाठी तैनात करण्यात आलेले शिष्टाचार आणि सुरक्षा अधिकार्यांना हटवण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगालच्या पोलीस महासंचालकांना कर्णन यांना ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर महासंचालकांनी बिधाननगर येथील आयुक्तांना आदेशही दिले. विशेष म्हणजे महासंचालकांच्या आदेशापूर्वी काही तास आधी बिधाननगर पोलिसांनीच कर्णन यांना विमानतळावर पोहोचवले होते.
उच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायमूर्ती असल्याने त्यांना पोलीस एस्कॉर्ट मिळाले होते. त्यामुळे त्यांना विमानतळापर्यंत सोडवण्याचे कर्तव्य आम्ही केले. काही तासानंतर त्यांना अटक करावी लागेल, हे आम्हाला माहीत नव्हते, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकार्याने सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयानंतर मंगळवारी सकाळी 11.40 वाजता पोलिसांनी कोलकाता येथील न्यू टाऊन भागातील कर्णन यांच्या घरी धाव घेतली. पण तेथील रजिस्टरमध्ये कर्णन हे 4.45 वाजताच कारमधून तेथून गेल्याची नोंद होती.