कोलकात्यात वाजणार यंदाच्या आयएसएलचा बिगुल

0

मुंबई । गतविजेते अ‍ॅथलेटिको कोलकाता आणि केरळ ब्लास्टर्स या गतविजेत्या उपविजेत्या संघामधील सलामीच्या लढतीत यंदाच्या हंगामातील हिरो इंडियन सुपर लीग स्पर्धेचा बिगुल वाजणार आहे. विवेकानंद युवा भारती क्रीडांगणमध्ये (साल्ट लेक स्टेडियम) 95 सामन्यांचा समावेश असलेल्या या लीगला 17 नोव्हेंबर रोजी सुरुवात होईल. याआधी दोन वेळा ही स्पर्धा जिंकणार्‍या एटीके आणि केरळ ब्लास्टर्स एफसी यांच्यातील सलामीच्या लढतीच्या निमित्ताने रॉबी किन आणि दिमितार बर्बातोव यांच्यातील युरोपातील कडवी झुंज भारतीय फुटबॉल प्रेमींना पहायला मिळेल. यावेळी लीगमध्ये 10 संघ असणार आहेत. बंगळुरू एफसी आणि जमेशेदपूर एफसी नवीन संघाचा समावेश झाल्यामुळे प्रथमच आयएसएलचा सीझन चार महिन्यांचा असेल.

या सिझनची पहिली महाराष्ट्र डार्बी एफसी पुणे आणि मुंबई सिटी एफसी दरम्यान 29 नोव्हेंबर, 2017 रोजी श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल, पुणे येथे संपन्न होईल. जमशेदपूर एफसी आपला पहिला घरचा सामना नूतनीकरण करण्यात आलेल्या जेआरडी टाटा क्रिडा संकुल स्टेडियममध्ये गतविजेत्या एटीके विरुद्ध 1 डिसेंबर रोजी खेळेल. लीगमधील 10 फ्रॅचायझींनी एकत्रित 77 आंतरराष्ट्रीय आणि 166 देशांतर्गत खेळाडूंवर 132.75 कोटी रुपये खर्च केले आहेत. गेल्या सिझनच्या तुलनेत या हंगामातील सामन्यासाठीच्या अंतिम 11 खेळाडूंमध्ये जास्तीत जास्त विदेशी खेळाडूंची संख्या 6 वरून 5 करण्यात आल्याने क्लब्सना घरगुती स्तरावर विकसित झालेल्या खेळाडूंवर मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करावी लागली आहे.

आयएमजी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि स्टार इंडिया यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या फुटबॉल स्पोर्ट्स डेव्हलपमेंट लिमिटेडने आयएसएलच्या चौथ्या सिझनचे 95 सामन्यांचे वेळापत्रक शुक्रवारी जाहीर केले. सर्व 10 संघ होम आणि अवे अशा प्रकारात एकूण 90 सामन्यांमध्ये एकमेकांना सामोरे जातील ज्यानंतर दोन टप्प्यांची उपांत्य फेरी मार्चच्या दुसर्‍या आठवड्यात संपन्न होईल. अंतिम सामन्याची तारीख आणि स्थान नंतर जाहीर करण्यात येईल. लीगचे सर्व सामने बुधवार ते शनिवार दरम्यान संध्याकाळी 8 वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार) सुरू होतील तर रविवारी दोन लढती होतील ज्या अनुक्रमे संध्याकाळी 5.30 आणि 8 वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार) सुरू होतील.

सिझनची पहिल्या डबल हेडर मध्ये 19 नोव्हेंबरला, 2016 च्या अंतिम सामन्याची पुनरावृत्ती होऊन चेन्नईयन एफसी आणि एफसी गोवा यांच्यातील द्वंद्व बघायला मिळेल तर दुसर्‍या लढतीत श्री कांतीर्व स्टेडियम मधल्या आपल्या घरच्या लढतीद्वारे एएफसी कपच्या अंतिम फेरीत धडक मारणार्‍या बेंगलुरु एफसीला हिरो आयएसएलची प्रथमच चव चाखताना गेल्या सिझनमध्ये उपांत्य फेरी पर्यंत मजल मारणार्‍या मुंबई सिटी एफसीशी दोन हात करावे लागतील. या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे भारताचा कर्णधार सुनील छेत्री आपल्या जुन्या संघाला टक्कर देईल.