कोलकाता । आयपीएलच्या दहाव्या सत्रात तुफान फार्मात असलेल्या कोलकाता नाईट रायडर्ससमोर घरच्या मैदानावर सर्वात महागडा आणि धुरंदर खेळाडू बेन स्टोक्सला रोखण्याचे आव्हान असेल. तर दुसरीकडे भन्नाट फार्मात आलेल्या पुण्याला गौतम गंभीर-उथप्पा जोडीचे आव्हान मोडीत काढायचे आहे. सोमवारी गुजरात लायन्सने दिलेल्या 162 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पुणे सुपरजायंट्सचा संघ 4 बाद 42 असा संकटात सापडला होता. संघ अडचणीत सापडला असताना बेन स्टोक्सने धडाकेबाज खेळी करत पुण्याला एकहाती सामना जिंकून दिला होता.
पुण्याचा आत्मविश्वास दुप्पट वाढला
गुजरातला हरवून आत्मविश्वास वाढलेल्या पुण्याच्या संघात अजिंक्य रहाणेचा फॉर्म चिंतेचा विषय आहे. एकाच सामन्यात तळपलेली धोनीची बॅट पुन्हा तळपेल अशी आशा आहे. तर दुसरीकडे मागच्या सामन्यात हैदराबादकडून सपाटून मार खाल्लेल्या कोलकात्याला पुण्याविरुद्ध जिंकणे आवश्यक आहे. कोलकात्यासमोर स्मिथसह बेन स्टोक्सला रोखणे हे महत्वाचे आव्हान आहे. स्टोक्स आणि धोनीने पाचव्या विकेटसाठी 76 धावांची भागिदारी रचली. यामध्ये धोनीने केवळ योगदान 26 धावांचे योगदान दिले. धोनी बाद झाल्यावर बेन स्टोक्सने डॅनियल ख्रिश्चनच्या साथीने संघाला विजय मिळवून दिला. स्टोक्सने या सामन्यात 63 चेंडूंमध्ये 103 धावांची नाबाद खेळी केली. धोनीच्या नुसत्या खेळपट्टीवर उपस्थितीमुळेही किती फरक पडू शकतो, याचा प्रत्यय सोमवारी पुणे विरुद्ध गुजरात सामन्यात आला. धोनीच्या कानमंत्रामुळे फायदा झाल्याचे देखील स्टोक्सने म्हटले. यामुळे धोनी हे देखील कोलकात्यासमोर एक आव्हानच आहे. ताहीरच्या फिरकीला उत्तर देण्याचे देखील आव्हान आहे.