कोल्हापूर : बँकेतून परतणाऱ्या शिक्षिकेला शहर बसने जोरदार धडक दिली. या धडकेत शिक्षिका राधिका नरेंद्र तेरदाळ या जागीच मृत्यू झाल्याची घटना शहरातील मंगळवार पेठेतील बाल संकुलासमोर घडली.
राधिका तेरदाळ या सुर्वेनगरातील महावीर इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. त्या मंगळवार पेठेतील बाल संकुलासमोरील बँकेतील काम आटोपून मोपेडवरुन घरी जात होत्या. दरम्यान बँकेत काहीतरी विसरल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्या पुन्हा संभाजीनगर, एससीबोर्डमार्गे जाण्यासाठी निघाल्या होत्या. त्यानंतर त्या परत बँकेकडे येत असताना केएमटी बसने त्यांच्या वाहनाला धडक दिली. या धडकेत त्या गंभीर जखमी झाल्या.
यावेळी नागरिकांनी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना अधिक उपचारासाठी सीपीआरमध्ये नेण्यास सांगितले. सीपीआर रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. केएमटी चालक एम. एम. नाईक यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विद्यार्थीप्रिय शिक्षिकेचा अपघातात मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.