कोल्हापूर । कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या पाच सहा दिवसांपासून पडत असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे सर्व नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पावसाचा जोर जरी कमी झाला तरी, पावसाची रिपरिप कायम आहे. शुक्रवारी कोल्हापूर गगनबावडा राज्य मार्गावर किरवे गावाजवळ गोव्याकडून कोल्हापूरकडे येणार्या 5 खासगी बस आणि 4 ट्रक अडकल्या आहेत. या पाचही बसमध्ये सुमारे 250 प्रवासी असल्याची माहित आहे. यावेळी बचाव पथकाने कार्य केले. गगनबावडा हा तालुका अतिशय डोंगराळ आणि दुर्गम तालुका आहे. त्यामुळे या परिसरात सध्या अतिवृष्टी होत आहे. नद्यानाल्यांना पूर आला आहे. राज्यमार्गावर सुद्धा कासारी नदीला आलेल्या पुराचे पाणीआल्याने जिल्हा प्रशासनाने या रस्त्यांवर रात्रीच सुरक्षेसाठी बॅरेकेटिंग लावले होते, अशी माहिती कोल्हापूरचे निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिली.
वाहने पुराच्या पाण्यात अडकली
1 गोवा राज्यातून प्रवासी वाहतूक करणार्या 5 खासगी बस आणि 4 ट्रकचालकांनी ही बॅरेकेटिंग काढून आपली वाहने पुराच्यापाण्यातून रस्त्याच्या पलीकडे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पुराचे पाणी वाढलेले असल्याने रस्त्याचा अंदाज न आल्याने ही वाहने पुराच्या पाण्यातच अडकून पडली.
2 खासगी बसेसमध्ये जवळपास 250 प्रवासी प्रवास करत होते. किरवे गावच्या सरपंचांना ही माहिती मिळतात ग्रामस्थांच्या सहकार्याने त्यांनी या पुराच्या पाण्यात अडकून पडलेल्या प्रवाशांना व ट्रकमधील चालकाना चहा- नाष्टा पोहोचवला असून गगनबावडा तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधून मदत कार्याची मागणी केली. बोटी पाठवून या पुराच्या पाण्यात अडकून पडलेल्या प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या कामाला यावेळी सुरुवात करण्यात आली.
कोयना धरण होतेय ‘फुल्ल’!
पाटण । कोयना धरण क्षेत्रात पावसाची सर कायम असल्याने कोयना धरण फुल्ल होत असल्याचे चित्र दिसत आहे. या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. धरणात आता एकूण 64.59 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. 105 टीएमसी पाणीसाठवण क्षमता असणार्या या धरणाला यापुढे पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी 40 टीएमसी पाण्याची अवश्यकता आहे. गुरुवारी सायंकाळीपासून शुक्रवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत धरणात तब्बल 2.73 टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. पावसाच्या सरी कोसळत असल्याने कोयनाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे.
अद्याप संपर्क तुटलेलाच
गडचिरोली । जिल्ह्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतली त्यानंतर पर्लकोटा नदीचा पूर ओसरल्याने भामरागड तालुक्याचा संपर्क सुरू झाला आहे. पर्लकोटा नदीच्या पुरामुळे भामरागडला जोडणारा मोठा पूल तीन दिवसांपूर्वी पाण्याखाली गेला. तर, पुराचे पाणी भामरागडमध्ये शिरल्याने तेथील काही कुटुंबांना सुरक्षीतस्थळी हलवावे लागले. दरम्यान, अहेरी तालुक्यातील किष्टापूरच्या नाल्याला पूर असल्याने अजूनही 25 गावांचा जिल्ह्याच्या मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. चार ते पाच जण खांद्यावर मोटरसायकल उचलून खोल पाण्यातून वाट काढत असल्याचे चित्रही या पावसात दिसून आले.
कोकणात कॉजवे पाण्याखाली
कोकणातही पावसाचा जोर दिसून येत आहे. अतिवृष्टीमुळे भात शेतीला धोका पोहोचतोय काय, अशी भीत कोकणातील शेतकर्यांना लागली आहे. पावसामुळे नदी पात्रात पाण्याची वाढ झाली असून अनेक गावांतील कॉजवे पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे शाळा, कॉलेजला जाणारे विद्यार्थी व पादचार्यांचे हाल झाले. गेल्या 24 तासांत तालुक्यात 140 मी.मी. इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. यावर्षी पावसाळी हंगामातील गेले तीन-चार दिवस पडणारा पाऊस हा सर्वात जास्त आहे. आखवणे येथील कॉजवे पाण्याखाली गेल्याने सकाळच्या सत्रातील एसटी बस मौदे येथे जाऊ शकली नाही. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय झाली.