साकळीतील वासुदेव सूर्यवंशीची पथकाकडून गोपनीय चौकशी
यावल- कॉ.डॉ.गोविंद पानसरे हत्या प्रकरणात संशयीत आरोपी व साकळीचा गॅरेज व्यावसायीक वासुदेव सूर्यवंशी यास कोल्हापूर एसआयटीने अटक केल्यानंतर त्यास बुधवारी साकळी मूळ गावी चौकशीसाठी आणण्यात आले होते. पानसरेंच्या हत्येसाठी मारेकर्यांनी वापरलेली दुचाकी बेळगावातून चोरण्यात आली व नंतर तिची विल्हेवाट लावण्यात आल्याचे तपासात उघड झाले असून या कामाची जवाबदारी सूर्यवंशीवर सोपवण्यात आल्याने बुधवारी पथकाने आरोपीच्या घराची पाहणी केली तसेच गुप्त ठिकाणी नेवून आरोपीने दुचाकी कुठे नष्ट केली? याबाबत विचारणा करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणाबाबत शुक्रवारी उच्च न्यायालयासमोर अहवाल सादर केला जाणार असल्याची शक्यता आहे.
वासुदेव सूर्यवंशीवर वाहन नष्ट केल्याचा आरोप
कॉ.पानसरे यांच्या हत्ये प्रकरणात मारेकर्यांनी दुचाकीचा वापर केला होता व नंतर ही दुचाकी नष्ट करण्यात आली होती. व्यवसायाने मॅकेनिक असलेल्या साकळीच्या वासुदेव सूर्यवंशी हे काम केल्याचा पथकाला दाट संशय असल्याने त्यास अटक करण्यात आली तसेच या हत्येतील दुसरा संशयीत वीरेंद्रसिंह तावडेच्या सांगण्यावरून आरोपीने बेळगावातून दुचाकी चोरली व नंतर तिची विल्हेवाट लावण्यात आल्याचा पथकाला संशय आहे. या प्रकरणात भारत उर्फ भरत जयवंत कुरणे (37, रा. धर्मवीर संभाजी गल्ली, महाद्वार रोड, बेळगाव) याचाही महत्वाचा सहभाग असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, सुरुवातीला वासुदेव भगवान सुर्यवंशी (28) यास 6 सप्टेंबर रोजी नालासोपारा स्फोटक प्रकरणी अटक झाली होती तर नंतर पानसरे हत्येशी आरोपीचे कनेक्शन असल्याचा खुलासा पुढे आला होता.