कोल्हापुर : चंदगड तालुक्यात प्रार्थनेसाठी जमलेल्या ख्रिश्चन धर्मियांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना बेळगावातून ताब्यात घेतलं आहे. कोल्हापूर पोलिसांनी शुक्रवारी रात्री ही कारवाई केली असून अटक करण्यात आलेले तरुण कोणत्याही संघटनेशी संबंधित नसल्याचं प्राथमिक चौकशीत समोर आलं आहे. दरम्यान, या हल्ल्यात जखमी झालेल्यांपैकी चौघांची प्रकृती गंभीर आहे.
कोल्हापूरच्या चंदगडमधील कोवाड गावात २३ डिसेंबर रोजी न्यू लाइफ फेलोशिप चर्चमध्ये ४० ख्रिश्चन धर्मीय प्रार्थनेसाठी जमले होते. यावेळी दुचाक्यांवर आलेल्या काही अज्ञात हल्लेखोरांनी प्रार्थना करणाऱ्या भाविकांवर बिअरच्या बाटल्या आणि दगडफेक करीत तलवार व लोखंडी रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात १० ते १२ लोक जखमी झाले आहेत. जखमींपैकी ४ जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरू आहेत.
काँग्रेसनं केला निषेध
दरम्यान कोवाडमधील हल्ल्याचा काँग्रेसनं जोरदार निषेध केला आहे. ‘सरकार आणि पोलीस प्रशासनाच्या पाठिंब्यामुळेच अल्पसंख्याक समाजावर कट्टरतावाद्यांकडून हल्ले सुरू आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.