कोल्हापूर जि.प.त रिक्त पदे भरणार

0

कोल्हापूर । राज्यातील सर्व जिल्हा परिषदेतील कर्मचार्‍यांची रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार आहे. त्यासाठी संपूर्ण जिल्हा परिषदांकडून रिक्त जागांचा अहवाल मागविण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेने 342 पदे रिक्त असल्याचे कळविले आहे. दरम्यान, भरतीची प्रक्रिया आता ऑनलाईन पद्धतीने राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. पूर्वी ही भरती निवड समितीमार्फत केली जायची. नव्या निर्णयामुळे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीच्या कक्षातून ही भरती आता वगळण्यात आली आहे. राज्यातील सर्व जिल्हा परिषदेतील नामनिर्देशच्या कोट्यातील वर्ग तीनची रिक्त पदे भरण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्यासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. या निवड समितीमार्फत जिल्हा स्तरावरील सर्व विभागांच्या वर्ग तीनच्या पदांची भरती केली जाते. भरतीकरीता राबविण्यात येणार्‍या प्रक्रियेत प्रश्‍नपत्रिका तयार करणे, परीक्षा घेणे, उत्तरपत्रिका तपासणे आदी कामे करावी लागतात.

परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार; पदासाठी राहणार पसंतीक्रम
कामात जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच अन्य जिल्हास्तरीय अधिकार्‍यांचा मोठ्या प्रमाणात वेळ जात होता. त्याचा परिणाम कार्यालयीन तसेच विकासकामांवर देखील होतो. त्यामुळे शासनाने यापुढे वर्ग तीनची भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्याचा निर्णय घेतला आहे. वर्ग तीनच्या नोकर भरतीची परीक्षा यापुढे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. खुल्या प्रवर्गासाठी 500 रुपये तर मागासवर्गीयांसाठी 250 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. हे शुल्क देखील भारतीय स्टेट बँकेच्या चलनाद्वारे ऑनलाईन आकारण्यात येणार आहे. एका उमेदवाराला एक किंवा अनेक संवर्गासाठी अर्ज करण्याची मुभा आहे, मात्र त्यासाठी प्रत्येक पदासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरावे लागेल. उमेदवारी अर्ज करताना संबंधितांनी कोणत्या जिल्हा परिषदेमध्ये नियुक्ती हवी आहे त्याबाबत त्यांना 1 ते 34 असे जिल्हा परिषदांसाठी पसंतीक्रम द्यावे लागतील. प्रत्येक संवर्गाची गुणवत्ता यादी व त्या सवंर्गासाठी न्यूनतम पात्रता गुण (कट ऑफ लिस्ट) प्रसिद्ध करण्यात येणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांची प्रमाणपत्रे सेवा प्रवेश नियमावलनीनुसार तपासण्याची कार्यवाही त्यांच्या मूळ जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत करण्यात येईल. ज्या उमेदवारांची कागदपत्रे सेवा प्रवेश नियमानुसार योग्य असतील त्या उमेदवारांना नियुक्तीसाठी पात्र ठरविण्यात येणार आहे. नियुक्तीस पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी त्यांच्या पसंतीक्रमाप्रमाणे व गुणानुसार जिल्हानिहाय पहिली यादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर पंधरा दिवसात उमेदवाराने संबंधित जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे त्या जिल्ह्यात हजर होऊन मूळ कागदपत्र सादर करावी.

हजर होतानाही दोन पर्याय
हजर होताना उमेदवारांना एक पर्याय निवडावा लागेल. फ्रिझ निवडलेल्या उमेदवारांना नियुक्ती दिलेला जिल्हा अंतिमत: मान्य असून यात बदल नको असल्याचे ग्राह्य धरून त्या जिल्ह्यात अंतिम नियुक्तीचे पत्र देण्यात येईल. जर उमेदवारांनी फ्लोट पर्याय दिला असेल तर त्यांना द्वितीय यादीत प्राधान्यक्रमात वर असलेला जिल्हा मिळाल्यास प्रथम यादीत नियुक्ती मिळालेला जिल्हा सोडून त्या जिल्ह्यात जाणे मान्य असल्याचे ग्राह्य धरण्यात येईल. दुसर्‍या यादीप्रमाणे यशस्वी उमेदवारांना त्यांच्या नियुक्त केलेल्या ठिकाणी हजर होणे बंधनकारक राहील.