मुंबई । कोल्हापूर आणि पुण्यात फिरते खंडपीठ व्हावे याकरता राज्य सरकार प्रयत्नशील आहे. यामध्ये भौगोलिकदृष्ट्या कोल्हापूरला प्राथमिकता देणार असून तो निर्णय पूर्णतः न्यायालयाचा असल्याने उच्च न्यायालयाचा आदेश आल्यानंतर लगेच राज्य सरकार आपली भूमिका घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. यासंदर्भात काही सदस्यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, कोल्हापूरच्या खंडपीठाची भूमिका स्वीकारली आहे मात्र याला उशीर होत असेल तर फिरते खंडपीठाची शिफारस करून उच्च न्यायालयाला विनंती करण्यात आली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
कोल्हापूर-पुणे असा वाद नको
यावेळी पुण्याचे काही सदस्य पुण्यासाठी आग्रही मागणी करू लागल्याचे दिसता हा निर्णय तुम्हाला-आम्हाला करता येत नाही. फिरत्या खंडपीठासाठी कोल्हापूरला प्राथमिकता आहे. यासाठी सुस्पष्ट ठराव केला गेला आहे. यामुळे कोल्हापूर-पुणे असा वाद नको असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. खंडपीठासाठी वकिलांचे आंदोलन सुरू आहे. त्या वकीलांशी लवकरच बैठक करू असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यासंदर्भात पंतप्रधान व कायदेमंत्री यांच्याशी चर्चा करून लवकर निर्णय घेण्यासंदर्भात विनंती करू असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. हा निर्णय न्यायालयाचा आहे. त्यामुळे आपण केवळ विनंती आणि शिफारस करू शकतो असेही सांगितले.