कोल्हेनगर, अक्सानगरात चोरट्यांचा धुमाकूळ

0

जळगाव । पहाटे घरातील कुणी सदस्य नमाज पठणाला गेला की, दार उघडे असल्याची संधी साधत चोरट्यांनी अक्सानगरातील मोहम्मद आसिफ मोहम्मद इसाक व मुक्तार बागवान यांच्या घरात डल्ला मारत एकूण सहा मोबाईल व सहा हजार रूपयांची रोकड चोरून नेल्याची घटना शुक्रवारी पहाटे 6.45 वाजेच्या सुमारास उघडीस आली आहे. तर 11 एप्रिल रोजी कोल्हे नगरातील शिवनेरी अपार्टमेन्ट मध्ये उघड्या खोलीत सर्व झोपलेले असतांना अज्ञात चोरट्याने खोलीतील 48 हजार रूपये किंमतीचे तिन मोबाईल तर 30 हजार रोख रूपये असा एकुन 78 हजार रूपयांचा ऐवज लंपास केल्या प्रकरणी रामानंद पोलिस स्थानकात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या पंधरा दिवसात अक्सानगरासह शहरातील इतर भागात आणखी तीन ते चार ठिकाणी याच पध्दतीने चोरी करत चोरट्यांनी धुमाकुळ घातला आहे.

नमाजला गेल्याने साधली संधी
अक्सानगरातील प्लॉट नं. 92 येथे मोहम्मद आसिफ मोहम्मद इसाक हे पत्नी, मुलं तसेच बहिण व भावासह वास्तव्यास आहेत. त्यांचे दोन मजली घर असून कपाट दुरूस्तीचा व्यावसाय आहे. गुरूवारी जेवणानंतर आसिफ व त्यांचे भाऊ आरीफ हे कुटूंबियांसह वरच्या मजल्यावर तर बहिण रजिया बानो व आरीफ यांचे मोहम्मद फैस, मो. फैजिल व मो.फैजल हे तिघं मुले खालच्या खोलीत झापलेले होते. नेहमी प्रमाणे मो. फैजिल हा पहाटे जाग आल्यानंतर पाच वाजता घराचा दार अडकवून नमाज पठणासाठी घराबाहेर निघाला. यानंतर साडे पाच वाजता रजिया बानो यांना जाग आल्यानंतर त्या टॉयलेटला गेल्या. त्याचे वेळी दार उघडा असल्याची संधी साधत चोरट्यांनी पाचच मिनिटात पहिल्याच खोलीतील तीन महागडे मोबाईल व एक टॅबलेट यासह पाकिटात ठेवलेले मोहम्मद फैस याचे पगाराचे सहा हजार रूपये घेवून चोरटा पसार झाला. 5.35 वाजता दार बंद केल्याचा आवाज येताच रजियाबानो यांनी आरडा-ओरड केल्यानंतर कुटूबिंय झोपेतून जागे झाले.

उघड्या दरवाजाचा फायदा
बांभोरी अभियांत्रीकी महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या उज्ज्वल सुभाष राऊत (रा. कोचूर रावेर ह.मु. शिवनेरी अपार्टमेंट, कोल्हे नगर) या विद्यार्थ्यांसह मित्र शुभम पाटील, सागर गवंडे यासह भाड्याच्या खोलीत राहतात. 11 एप्रिल रोजीच्या रात्री 11 वाजता मित्रांसह रूमवर असतांना सागर गवंडे याला फोन आल्यानंतर तो फोनवर बोलण्यासाठी दरवाजा उघडाच ठेवून बाहेर निघून गेला. त्यानंतर खोलीचा दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेत 12.30 ते सकाळी 4.25 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी 48 हजार किंमतीचे तीन मोबाईल व 30 हजार रूपये रोख असे एकुण 78 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. रामानंद पोलिसात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

काही अंतरावर दुसरी चोरी
मोहम्मद आसिफ यांच्या घराच्या काही अंतरावरच वास्तव्यास असलेले फळ विक्रेता मुक्तार बागवान यांच्या घराकडे चोरट्यांनी मोर्चा वळवला. मुक्तार यांचे भाऊ मोहम्मद इजाज हे सकाळी नमाज पठणासाठी गेले होते. त्यामुळे त्यांनी दार अडकवलेले होते. चोरट्यांनी पून्हा हीच संधी साधत कुटूंबिय घरात झापलेले असताना थेट शेवट्या खोलीत जाऊन सहा हजार व साडेतीन हजार रूपये किंमतीचे दोन मोबाईल चोरून नेले. ही घटना सकाळी सहा वाजता मुक्तार यांच्या
लक्षात आली.

चोरीची पध्दत सेम टू सेम
शुक्रवारी अक्सानगरात दोन ठिकाणी चोरी झाल्याचे उघड झाल्यानंतर याच परिसरात पंधरा ते वीस दिवसात आणखी तीन ठिकाणी याच पध्दतीने चोरट्यांनी डल्ला मारीत मोबाईल लांबविल्याचे समोर आले. यात फळविक्रेता शकील बागवान हे देखील नमाज पठाणासाठी गेल्यानंतर त्यांच्या घराचे दार उघडे असल्याची संधी साधत दहा हजार व साडे तीन हजार रूपये किंमतीचे असे दोन मोबाईल चोरट्यांनी लांबविले होते. याच प्रमाणे रईस बागवान यांच्या घरातून देखील दोन मोबाईल तर नाजीम जनाब यांच्या घरातून एक मोबाईल चोरीला गेल्याचे समोर आहे. त्यामुळे परिसरात घबराहटीचे वातावरण निर्माण झाले आहे.