कोळदे-शहादा राज्यमार्गावरील अपघातांची चौकशी करा

0

नंदुरबार । तालुक्यातील कोळदे ते शहादा राज्यमार्गावर झालेल्या अपघातांची चौकशी होवून ठेकेदारांवर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी केली आहे. या प्रकरणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. रस्त्याच्या कामामुळे जीव गमावलेल्या अथवा जखमी झालेल्या कुटुंबियांना न्याय मिळावा अन्यथा कोळदा-शहादा रस्त्यावर मनसेतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी दिला आहे.

मनसेची आक्रमक भूमिका
याबाबत जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात विजय चौधरी यांनी म्हटले आहे की, नंदुरबार तालुक्यातील कोळदे ते शहादापर्यंत राज्य महामार्गाचे काम सुरू आहे. मात्र या कामावरील ठेकेदारांच्या दुर्लक्षपणामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणावर अपघातांची संख्या वाढू लागली आहे. ड्रायव्हरशनची योग्य व्यवस्था केली नसल्याने एकाच रस्त्यावर येणार्‍या-जाणार्‍या वाहनांची संख्या कमालीची वाढत असते. त्यातच रस्त्यावरील मातीची धूर उडून डोळ्यात जाते. त्यामुळे समोरचे वाहन दिसत नाही. अशावेळी अपघात होत असतात. आतापर्यंत या रस्त्यावर अपघातामुळे तीन जणांचा बळी गेला आहे व अनेक जण जखमी झाले आहेत. या सर्व घटनांना ठेकेदार अथवा एजन्सीला जबाबदार धरून त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी. या रस्त्यावर कामामुळे एखादी घटना घडली तर ती मॅनेज करण्यासाठी ठेकेदाराने स्थानिक दलालांची नियुक्ती केली आहे. पोलिस ठाण्यात कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल न करता परस्पर प्रकरण मिटविण्यात येते.