यावल : रस्त्याने पायी चालणार्या यावल तालुक्यातील कोळन्हावीच्या मजुराला भरधाव दुचाकीने धडक दिल्याने मजूर जखमी झाला होता. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी चुंचाळेतील दुचाकीस्वाराविरोधात जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नामदेव श्रावण सोळंके (43) असे मयत मजुराचे नाव आहे.
दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा
यावल तालुक्यातील कोळन्हावी येथील नामदेव श्रावण सोळंके (43) हे मजुरी काम करुन त्यांचा उदरनिर्वाह करीत होते. शनिवार, 9 एप्रिल रोजी कामानिमित्ताने ते विदगाव कोळन्हावी रस्त्याने पायी जात असतांना त्यांना समोरुन येणार्या दुचाकी (एम.एच. 19 बी.पी.9964) ने धडक दिली व दुचाकीस्वाराने पळ काढला. या धडकेत नामदेव सोळंके यांच्या डोक्यास तोंडावर गंभीर दुखापत झाली व उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या अपघातप्रकरणी मयत नामदेव सोळंके यांचा मुलगा बादल सोळंके (19) याने दिलेल्या तक्रारीवरुन सोमवार, 25 एप्रिल रोजी दुचाकीस्वार सचिन दिनकर सावळे (चुंचाळे, ता.यावल) याच्याविरोधात जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक फौजदार माणिक सपकाळे करीत आहेत. मयत नामदेव सोळंके यांच्या पश्चात पत्नी मंगलाबाई तसेच बादल व सौरभ असा परीवार आहे.