कोळवदच्या बेपत्ता तरुणाचा नाल्यात मृतदेह आढळला

0

फैजपूर- तालुक्यातील कोळवद येथील बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह यावल फैजपूर मार्गावरील हिंगोणा गावाजवळ असलेल्या नाल्यात मिळून आला. मयताची ओळख पटली असून पोलिसांनी पंचनामा करून त्याच ठिकाणी योगेशवर अंत्यसंस्कार करण्यात आले. कोळवद येथील योगेश सोपान सुर्यवंशी (26) हा 25 जून रोजी सकाळी 11.30 वाजता यावल येथे लक्झरी बसचे टीकीट बुकींग करून येतो, असे सांगून घरुन निघाला. तो दुपारच्या चार वाजेपर्यंत घरी न आल्याने त्याच्या कुटुंबाने सर्वत्र त्याची शोधाशोध घेतली असता तो मिळून न आल्याने अखेर यावल पोलिसात योगेश सोपान सूर्यवंशी हरवल्याची खबर देण्यात आली होती.

मयताच्या कुटुंबियांनी ओळख पटवली
यावल-फैजपूर मार्गावरील मोर धरणाच्या वसाहतीच्या शेजारी असलेल्या नाल्यात कुणीतरी अनोळखी व्यक्तिचे मृतदेह मिळुन आल्याची माहिती फैजपूर पोलिस स्टेशनला प्राप्त झाली. फैजपूर पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी उमेश पाटील व विनोद पाटील यांनी घटनास्थळी मृतदेहाचा पंचनामा केला. हरवलेल्या व्यक्तीबाबत शोध सुरू असताना मरण पावलेला तरुण हा 25 जुनपासून बेपत्ता असलेला व्यक्ति असल्याचे यावल येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित ठाकरे यांनी हरवल्या व्यक्तीच्या कुटुंबास घेवुन हिंगोणा येथील घटनास्थळी तपास केला असता तो 25 जुन रोजी हरवलेला योगेश सोपान सुर्यवंशी असल्याची ओळख त्याच्या कुटुंबीयांकडुन पटली. या बाबत पोलिसांनी योगेशच्या कुटुंबाला विचारले असता कुणावर संशय आहे का त्यावर त्यांनी नकार दिला. तपास पोलिस कॉन्स्टेबल उमेश पाटील करीत आहे.