कोळशाच्या साठ्यानंतर दीपनगरातील संच क्रमांक पाच कार्यान्वित

0

दोन संचाद्वारे 783 मेगावॅट वीजनिर्मिती ; दोन दिवस पुरेल इतका कोळशाचा साठा शिल्लक

भुसावळ- कोळशाचा साठा संपल्याने दीपनगरातील संच क्रमांक पाच बंद करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवल्यानंतर तब्बल आठव्या दिवशी कोळसाचा साठा उपलब्ध झाल्यानंतर सोमवारी संच क्रमांक पाचमधून वीज निर्मितीला सुरुवात करण्यात आली. संच क्रमांक चार व पाचमधून सोमवारी 783 मेगावॅट विजेची निर्मिती झाली. सध्या दोन दिवस पुरेल इतका कोळशाचा साठा म्हणजे 34 हजार मेट्रीन टन कोळसा निर्मिती केंद्रात शिल्लक असल्याचे सूत्रांनी सांगितले. दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात कोळशाच्या टंचाईमुळे 30 सप्टेंबर रोजी बंद करण्यात आलेला संच क्रमांक पाच तब्बल आठव्या दिवशी कार्यरत करण्यात आला.

कोळशाअभावी बंद करण्यात आला होता संच
दीपनगर औष्णिक केंद्रात सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात कोळशाची टंचाई निर्माण झाल्यानंतर 30 सप्टेबर रोजी 510 मेगावॅट स्थापित क्षमतेचा संच क्रमांक पाच वीजनिर्मितीसाठी बंद करण्याची नामुष्की ओढवली. यापूर्वीच 210 मेगावॅट स्थापित क्षमतेचा संच क्रमांक तीन एमओडीमुळे बंद असल्याने केवळ संच क्रमांक चार या एकमेव संचातून निर्मिती सुरू होती. 30 सप्टेबर ते 8 ऑक्टोबर या आठ दिवसांच्या काळात संच क्रमांक पाच बंद असल्याने या संचासाठी मिळणारा कोळसा शिल्लक राहिला. यामुळे दीपनगर केंद्राचा कोळसा साठा आता 34 हजार मेट्रीक टन असल्याचे मुख्य अधिकारी बावस्कर म्हणाले. किमान दोन दिवस इतका साठा आता शिल्लक असल्याचे ते म्हणाले.

तर भारनियमन निश्चित
राज्यातील महानिर्मितीच्या सर्वच औष्णिक केंद्रांकडे कोळसा साठा कमी आहे. यामुळे वीजनिर्मितीचा पीएलएफ देखील घसरला आहे. अजून आठवड्याभर हीच स्थिती राहिल्यास भारनियमन निश्चितपणे सुरू होऊ शकते, अशी माहितीही महानिर्मितीच्या मुख्यालयातील सुत्रांनी दिली. सोमवारी राज्यात 20 हजार 749 मेगावॅट विजेची मागणी असलीतरी प्रत्यक्षात मात्र 13 हजार 723 मेगावॅट विजेची निर्मिती झाली.

नियमित संच सुरू ठेवण्याचे प्रयत्न
सोमवारी दीपनगर केंद्रात कोळशाचे चार रॅक आल्याने तब्बल 34 हजार मेट्रीक टन कोळशाचा साठा शिल्लक राहणार असून तो किमान दोन दिवस पुरणार आहे. शिवाय यापुढे कोळशाची टंचाई न भासण्यासाठी नागपूर येथे स्वतंत्र अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली असून हे अधिकारी रेल्वे व कोळसा खाणीच्या संपर्क राहतील, असे मुख्य अभियंता आर.आर.बावस्कर म्हणाले. कमी इंधनात अधिक वीज निर्मितीचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.