कोविंद यांचा राज्यपालपदाचा राजीनामा

0

नवी दिल्ली/पुणे : बिहारच्या राज्यपालपदाचा रामनाथ कोविंद यांनी राजीनामा दिला असून, पश्चिम बंगालचे राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांच्याकडे या पदाचा तात्पुरता पदभार सोपविण्यात आलेला आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीदेखील कोविंदा यांचा राजीनामा स्वीकार केला आहे. राष्ट्रपती निवडणुकीसाठी कोविंद हे 23 जूनरोजी सकाळी 11 वाजता नामांकन दाखल करणार आहेत. याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यासह ज्येष्ठ मंत्रीदेखील हजर राहणार आहेत. राष्ट्रपतिपदासाठी उमेदवार म्हणून घोषणा झाल्यानंतर स्वतः मोदी यांनी रामनाथ कोविंद यांना दूरध्वनी करून अभिनंदन केले होते. त्यानंतर मंगळवारी कोविंद यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन चर्चा केली. सिंह यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान, कोविंद यांच्या उमेदवारी अर्जावर महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या 25 आमदारांनी मंगळवारी सूचक म्हणून स्वाक्षर्‍या केल्या. पुण्यातील पाच आमदारांचा यात समावेश होता.

भाजपकडून विशेष गट सक्रीय
पुण्यातून राज्यमंत्री दिलीप कांबळे, भोसरीचे अपक्ष आमदार तथा भाजपचे सहयोगी सदस्य महेश लांडगे, आमदार बाळ भेगडे, भीमराव तापकीर, विजय काळे हे पाच जण दिल्लीला गेले होते. राज्याच्या इतर भागातूनही आमदार आले होते. संसदीय कामकाजमंत्री अनंतकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष गट भाजपने या निवडणुकीसाठी सक्रिय केला आहे. यात राज्यमंत्री मुक्तार अब्बास नक्वी आणि सरचिटणीस भूपेंद्र यादव यांचा समावेश आहे. या अर्जावर अनुमोदक म्हणून 50 आमदार किंवा खासदार आणि सूचक म्हणूनही तितक्याच संख्येने आमदार किंवा खासदार सूचक म्हणून आवश्यक असतात. म्हणजे एका अर्जावर शंभर जणांच्या स्वाक्षर्‍या आवश्यक असतात. भाजपकडून चार अर्ज दाखल केले जाणार आहेत. त्यासाठी प्रत्येक राज्यातील खासदार आणि आमदारांना मंगळवारी दिल्लीत बोलविण्यात आले होते. महाराष्ट्रातील भाजप आमदारांनी सहप्रभारी राकेश सिंग यांच्या निवासस्थानी जाऊन या अर्जावर सह्या केल्या.