कोविंद यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोध

0

मुंबई – दलित समाजाची मते मिळवण्यासाठी जर राष्ट्रपती पदासाठी रामनाथ कोविंद यांची उमेदवारी जाहीर केली जात असेल तर त्यात आम्हाला रस नाही, अशा शब्दात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोविंद यांची उमेदवारी शिवसेनेला मान्य नसल्याचे स्पष्ट संकेत दिले.

मुंबईतील षण्मुखानंद हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या 51 व्या वर्धापनदिनाच्या मेळाव्यात ते बोलत होते. उद्या शिवसेना नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली असून त्यात शिवसेना आपली भूमिका निश्चित करेल, असे त्यांनी स्पष्ट केले. कोविंद यांच्या उमेदवारीच्या भारतीय जनता पार्टीच्या निर्णयाचा समाचार घेताना ते म्हणाले की, देशाचे भले करण्याच्या हेतूने कोणताही उमेदवार दिला तर शिवसेना तुमच्या सोबत आहे. मतांचे राजकारण पक्षासाठी फायदेशीर असेल. मात्र, ते देशाला रसातळाला घेऊन जाईल.

शिवसेनेने कधी पाठीमागून राजकारण केले नाही. हिंदुत्त्वासाठी आणि देशासाठी आम्ही राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे नाव सुचविले. देशात एक विधान एक प्रधान असे असले पाहिजे. आपल्याला देशात समान नागरी कायदा आणायचा आहे. मात्र, जर देशातील सर्व राज्यांमध्ये आपण गोवंश हत्त्याबंदीचा कायदा करत नसू तर मग समान नागरी कायदा कसा करू शकतो, असा सवाल त्यांनी केला. मोहन भागवत यांच्या नावामुळे कुणाला अडचण वाटत असेल म्हणून आम्ही शेतकऱ्यांचे भले पाहणारे स्वामीनाथन यांचे नाव राष्ट्रपतीपदासाठी सुचवले. हे आम्ही राजकारणासाठी सुचवले नसून देशाच्या भल्यासाठी सुचवले, असेही ते म्हणाले.

.. तर मध्यावधी निवडणूक घ्या!
मध्यावधी निवडणूक घेण्याची आम्हाला सतत धमकी दिली जात आहे. मध्यावधी निवडणूक आता घ्या. आम्ही तयार आहोत. जर मध्यावधी निवडणुका घेतल्याच तर शिवसैनिक वणव्या सारखा पेटेल. सदासर्वदा आम्हीच जिंकू असे कुणी समजू नये. जर कोणामध्ये हिंमत असेल, तर घ्या मध्यावधी निवडणूक. शिवरायांच्या महाराष्ट्रात तुम्हाला गाडून तुमच्या छाताड्यावर भगवा फडकावल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी भाजपाला दिला.