कोविड-19 लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत जनजागृती मोहीमेचा जिल्हाधिकार्यांच्या हस्ते शुभारंभ
जळगाव: कोरोना महामारीवर मात करण्यासाठी मास्कचा वापर करणे, वारंवार हात धुणे, सामाजिक अंतर पाळणे या त्रिसुत्रीचा प्रभावीपणे वापर करणे आवश्यक आहे. आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत लसीकरणाची माहिती देण्यासाठी तयार करण्यात आलेला चित्ररथ जिल्ह्यात प्रभावीपणे जनजागृती करेल. कोरोना लस ही सुरक्षित असून त्याचे कोणतेही दुष्परिणाम नाही, त्यामुळे नागरीकांनी अफवांवर विश्वास न ठेवता लसीकरणाच्या मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयातील प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो, पुणेच्या अधिनस्त क्षेत्रिय लोकसंपर्क ब्युरो यांच्या उपक्रमांतर्गत कोविड-19 लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत या विषयावर जिल्ह्यातील जामनेर, एंरोडल, धरणगाव, भुसावळ, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, यावल आणि अमळनेर आदि तालुक्यात जनजागृतीसाठी तयार केलेल्या बहुमाध्यमी मोबाईल व्हॅनवरील फिरत्या प्रदर्शनाचे तसेच कलापथक मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.
यावेळी दिशा समाज प्रबोधन बहुउद्देशिय संस्थेचे विनोद ढगे आणि त्यांच्या कलापथकातील कलाकारांकडून स्थानीक बोली भाषेच्या माध्यमातून लोकांपर्यंत जनजागृती संदेश पोहचविण्यात येत आहे. जिल्ह्यातील जनजागृती मोहिमेसाठी जिल्हा आरोग्य विभाग आणि जिल्हा माहिती कार्यालयाचे सहकार्य लाभले आहे. या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी बापू पाटील, किरणकुमार आणि चमु परिश्रम घेत आहेत.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोजीराव चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटोडे, क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो अमरावतीचे अंबादास यादव, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, नेहरू युवा केंद्राचे नरेंद्र डांगर, सेवानिवृत्त प्रचार अधिकारी उल्हास कोल्हे आदि उपस्थित होते.