कोविड-19 निवासी पक्षी गणना उपक्रमात ४० जातींच्या ७६९ पक्ष्यांची नोंद

0

जळगाव: निसर्गमित्रतर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ९,१० व ११ एप्रिलला तीन दिवसीय निवासी पक्षी निरीक्षण आणि गणना असा उपक्रम राबविण्यात आला. या गणनेत ४० जातींच्या ७६९ पक्ष्यांची नोंद करण्यात आल्याची माहिती पक्षीमित्र शिल्पा गाडगीळ आणि राजेंद्र गाडगीळ यांनी दिली. या तीन दिवसांत शिवाजीनगर येथे पक्ष्यांच्या सर्वात जास्त म्हणजे २० जातीची नोंद झाली. एमआयडीसी येथे १६, श्यामनगर येथे ११ तर शिरपूर येथील महात्मा फुले नगरमध्ये १६ जातीचे, अमळनेर येथील पटवारी कॉलनी येथे १५ जातीचे पक्षी नोंदवण्यात आल्याची माहिती दिली.
पक्षी निरीक्षण व गणना करतांना या लॉकडाऊन काळात घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले होते. घरातील गच्चीत,परस –अंगणात येणाऱ्या पक्ष्यांचे निरीक्षण व गणना करून नागरिकांनी पक्षी निरीक्षण व गणनेचा आनंद घेतल्याची माहिती त्यांनी दिली.
उपक्रमात विविध ठिकाणच्या पक्षी प्रेमींनी आपला सहभाग नोंदवला. यात एमआयडीसी परिसर,गजानन कॉलनी,श्यामनगर,पिंप्राळा शिवाजीनगर,मेहरूण या भागातून आणि जळगाव बाहेरील अमळनेर,शिरपूर ,नागपूर येथील नरेंद्र नगर,पुणे येथील औंध परिसर कॉलनी आशा ठिकाणाहून प्रतिसाद मिळाल्याची माहिती पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ यांनी दिली. पक्षी निरीक्षण व गणनेत शिल्पा व राजेंद्र गाडगीळ,राजेश गडकर,किशोर पाटील,उमेश जावळे,अनिकेत शिंपी,अनिल शिंपी,राहुल कुंभार,कल्पना जावळे,नागपूरचे अनिल बंडे,औंध पुणे येथील रेणुका जोशी इत्यादींनी सहभाग घेतल्याअसून त्यांचे आभार निसर्गमित्र तर्फे शिल्पा व राजेंद्र गाडगीळ यांनी मानले.