कोविड-19 विरुद्धच्या लढ्यात तरुणाई उतरली

0

नवापूर ।कोविड-19चा संसर्ग रोखण्यासाठी अनेक सेवाभावी संस्था प्रशासनाला सहकार्य करीत असताना राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी मदत कार्यात पुढाकार घेतला आहे. विविध भुमिकांमध्ये हे विद्यार्थी प्रशासनाला सहकार्य करीत आहेत. विशेषत: कपड्याचे घरगुती मास्क तयार करून त्याचे वाटप करण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे.

राष्ट्रीय सेवा योजनचे जिल्हा समन्वयक डॉ. माधव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हे विद्यार्थी स्वयंस्फूर्तीने जनजागृती कार्यात उतरले आहेत. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे आवाहन केले होते. अनेक विद्यार्थ्यांनी हे अ‍ॅप डाऊनलोड करण्याबरोबर ग्रामीण भागातील नागरिकांना या अ‍ॅपचे महत्व सांगितले. आशा स्वयंसेविकेच्या सोबत घरोघरी जाऊन कोरोनाची माहिती असो वा सर्वेक्षण, विद्यार्थ्यांनी चांगले सहकार्य केले आहे.

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मास्क महत्वाचा असल्याने काही स्वयंसेवकांनी आपल्या अंगी असलेल्या शिवणकलेचा उपयोग करीत मास्क शिवले व त्याचे वाटप केले. विशेष म्हणजे यात विद्यार्थींनींसोबत विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. आपाआपल्यापरीने स्थानिक स्तरावर कपडा उपलब्ध करून घेत हे विद्यार्थी मास्क शिवत आहेत. या उपक्रमात सहभाग घेणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने वाढते आहे.

आरएफएनएस महाविद्यालय अक्कलकुवा, एसटी को ऑप एज्युकेशन सोसायटी शहादा, जीटीपी कॉलेज नंदुरबार, वसंतराव नाईक महाविद्यालय शहादा, कला महाविद्यालय बामखेडा अशा जिल्ह्यातील विविध भागात असलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे हा उपक्रम राबविला आहे. विद्यार्थ्यांनी कपड्याची व्यवस्था जमेल तशी केली. काहींनी दुकानातून आणला तर काही विद्यार्थ्यांनी आपल्यासाठी घेतलेल्या शर्टपीसचा वापर केला. काहींनी घरातील जुने कापड उपयोगात आणले. थोडेथोडे करून काम वाढत गेले आणि आता उत्साहाने विद्यार्थी यात सहभाग घेत आहेत.

कोरोनासारखे संकट असताना ‘नॉट मी बट यु’ या आमच्या ब्रीदवाक्यानुसार काहीतरी मदत केली पाहिजे, या भावनेने मास्क शिवले. दररोज 100 याप्रमाणे 500 मास्क शिवून गावात वाटले. संकटाशी लढताना योगदान देता येते याचे समाधान असल्याचे अनरद येथील लिना पाटील हिने सांगितले. देशासाठी प्रत्येक व्यक्ती योगदान देत असल्याने आपणही काहीतरी करावे ही भावना होती. शेजारच्या मावशी मास्क शिवत असताना शिकून घेतले. 60 मास्क तयार करून महाविद्यालयामागील वस्तीत वाटले. आरोग्यसेतूबाबत व्हिडीओ तयार करून सोशल मीडियाचा जनजागृतीसाठी वापर केला असल्याचे नंदुरबार येथील जीटीपी महाविद्यालयातील प्रतीक कदम याने सांगितले.