धुळे । कोषागार कर्मचार्यांच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य लेखा व कोषागारे कर्मचारी संघटनेच्यावतीने दि. 3 व 4 रोजी सामुहिक रजा आंदोलन करण्यात येणार आहे. तसे निवेदन संघटनेच्यावतीने नुकतेच जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. दरम्यान, या आंदोलनानंतरही प्रशासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास 6 जूनपासून बेमुदत संप पुकारण्यात येणार असल्याचा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे.
बैठकीत निर्णय…
संघटनेच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात, मागील पाच वर्षापासून कोषागार कार्यालयातील कर्मचार्यांवर होत असलेल्या अन्यायाबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येत आहे. याबाबत केंद्रिय संघटनेचे पत्र कोषागार कर्मचार्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या अनुषंगाने वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना देण्यात आलेले होते. दरम्यान, 17 मार्च रोजी प्रधानसचिव यांच्या दालनात झालेल्या चर्चेमध्ये पदोन्नती विषयक सर्व प्रस्ताव फेटाळण्यात आलेले आहेत. त्याअनुषंगाने सर्व कर्मचार्यांमध्ये नैराश्याची भावना वाढीस लागत असल्याचे नमुद करण्यात आले आहे. 25 मार्च रोजी औरंगाबाद येथे संघटनेची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये आंदोलन, संप करण्याचे एकमताने ठरविण्यात आल्याचेही यात नमुद करण्यात आले आहे. निवेदनावर अध्यक्ष उदय पाठक, उपाध्यक्ष पल्लवी साबळे व सचिव पंकज देवरे आदींच्या सह्या आहेत.