कोहलीची गतवर्षी तब्बल 600 कोटीची कमाई

0

नवी दिल्ली । तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये भारताचे कर्णधारपद भुषवणार्‍या कोहलीची ब्रॅण्डव्हॅल्यू यावर्षी गगनाला भिडली आहे. आपल्या कंपनीची ओळख आणि इतरांपेक्षा वेगळे स्टेटस निर्माण करण्यासाठी कंपन्या आपल्या जाहिरातीसाठी लोकप्रिय चेहर्‍यांना पसंती देतात. त्यात क्रिकेटपटू आणि सिनेअभिनेत्याकडे जास्त ओढ जाहिरातदारांची असते. गेल्या वर्षभरात कोहलीने केलेली अफलातून कामगिरी आणि त्याच्या आकर्षक लूकमुळेच जाहिरातदारांची पसंती त्याला जास्त आहे. क्रिकेटच्या मैदानात विराट कोहली दमदार फॉर्मात आहे. खोर्‍याने धावा जमा करतो आहे. त्याचप्रमाणे कोहलीची ब्रॅण्डव्हॅल्यू मैदानाबाहेर देखील गगनाला भिडली आहे.

ब्रॅण्डव्हॅल्यूच्या माध्यमातून केली कमाई

कोहलीने गेल्या वर्षात ब्रॅण्डव्हॅल्यूच्या माध्यमातून तब्बल 600 कोटींची कमाई केल्याची माहिती डफ अँड फेल्प्सने जाहीर केलेल्या आकडेवारीतून पुढे आली आहे. यादीत कोहली दुसर्‍या स्थानावर असून बॉलिवूडचा किंग शाहरुख खान अजूनही अव्वल स्थानावर आहे. भारतीय संघाचा कर्णधार झाल्यानंतर कोहलीच्या ब्रॅण्डव्हॅल्यूमध्ये 20 ते 25 टक्क्यांनी वाढ झाल्याचे डफ अँड फेल्प्सचे संचालक अविरल जैन यांनी सांगितले. चार मालिकांमध्ये सलग चार द्विशतक ठोकण्याचा पराक्रम कोहलीने ठोकून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. याबाबत कोहलीने सर डॉन ब्रॅडमन यांनाही मागे टाकले. सध्याच्या घडीला कोहली 20 पेक्षा अधिक ब्रॅण्डचे प्रमोशन करत आहे. यात जिओनी, अमेरिकन टुरिस्टर अशा मोठ्या ब्रॅण्डचाही समावेश आहे.