कोलकाता : तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील अखेरचा सामना अवघ्या ५ धावांनी गमवावा लागला असला तरी, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने मात्र, केदार जाधव आणि हार्दिक पांड्याचे कौतुक केले आहे. कालच्या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर ३२२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रतिउत्तरादाखल खेळणारा भारतीय संघ ३१६ धावांत आटोपला. भारताकडून केदार जाधवने सर्वाधिक ९० धावांची खेळी केली. त्याची खेळी विजय मिळवून देवू शकली नसली तरी विराट कोहलीने मात्र केदारचे तोंडभरून कौतुक केले आहे.
कोहली म्हणाला, ‘जाधव’ संघाला मिळालेला एक महत्वाचा खेळाडू आहे. त्याला यापूर्वी जास्त सामन्यात खेळायची संधी मिळाली नव्हती. मात्र, आता मिळालेल्या संधीचा त्याने चांगलाच फायदा घेत फलंदाजी केली आहे. त्याच्यामुळे युवी आणि धोनीला वर फलंदाजीला येणे शक्य झाले आहे. तो अभ्यासपूर्ण आणि संयमी खेळी करतो हे महत्वाचे आहे. हार्दिक पांड्याही स्वतःला अष्टपैलू खेळाडू म्हणून सिद्ध करू लागला आहे.